Thursday, 15 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस तिसरा


प्रत्येक घरी शास्त्रानुसार घटस्थापना केली जाते आणि पूर्ण ९ दिवस नंदादीप अखंड तेवत ठेवला जातो. शक्तीचे रूप तेजोमय आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अग्नी किंवा दीपाला आगळे स्थान आहे. प्रत्येक मंगल कार्याच्या सुरुवात दीप प्रज्वलनाने होते. अग्नीच्या योगाने देवाला आळवावे ही प्रथा जुनी आहे. अग्नी वा ज्योतीला सर्वात पवित्र वस्तू मानले आहे. अग्नी अशुद्ध गोष्टी शुद्ध करतो. ज्योत प्रकाश देते व अंधाराकडून प्रकाशाकडे नेते. ज्योत हे ज्ञानाचे सुद्धा प्रतिक आहे. अखंड नंदादीप लावण्यामागचे कारण असे की आपल्यामध्येही एक ज्योत(आत्मज्योत) आहे ज्याचा आपल्याला विसर पडलेला आहे त्याची सतत आठवण राहावी ज्यायोगे आपण त्या आत्मज्योतीचा शोध घेऊ व त्याप्रमाणे साधना करू. (नवरात्रीचा काळ हा साधनेसाठी व आत्मशोधासाठी आहे) कुठल्याही साधनेमध्ये अहंकार रहित होणे हे महत्वाचे मानतात. कारण अहंकार हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जेंव्हा अखंड ज्योत  तेवत ठेवतो तेंव्हा ती अहंकार जाळण्याची आठवण करून देते. (दिवा हे देहाचे व वात अहंकाराचे प्रतिक) अहंकार जाळला किंवा नष्ट झाला तरच आपल्या आतल्या ज्योतीचे दर्शन होणे शक्य आहे. बरेच जणांचा ह्यावर आक्षेप असतो की खूप तेल वाया जाते त्यापेक्षा गरिबाला द्यावे वगैरे.(पण असे म्हणणारे लोक ना दिवा लावतात ना गरिबांना देतात)  मलाही वाटते की जर एखाद्याची ऐपत नसेल तर त्यांनी हे करू नये. शेवटी भाव महत्वाचा. पण जे लोक बाकीच्या ठिकाणी प्रचंड उधळपट्टी करतात त्यांनी फक्त देवाच्या पुढे दिवा लावण्याच्या बाबतीत काटकसर करू नये. देवालाही कुठलीच अपेक्षा नसते. पण ह्या सगळ्या procedural गोष्टी करण्यामागे भावनिर्मिती करणे हा सुद्धा उद्देश्य आहे. दिवा लावण्यामुळे पवित्र वातावरण निर्मिती होते. (हे देवाकरता नसून आपल्या स्वतःकरता आहे ) साधनेमध्ये जेंव्हा प्रगती होईल तेंव्हा कुठल्याही उपचारांची आवश्यकता राहणार नाही पण तोपर्यंत हे सगळे करणे जरुरीचे आहे आपल्याला सगळ्या गोष्टींची आठवण करून देण्याकरता आणि त्या अंगवळणी पडण्याकरता. जेंव्हा आपण ह्या सगळ्या procedural गोष्टी भावपूर्ण होऊन करू, समजून व उमजून करू तेंव्हाच त्याचे खरे फळ मिळेल.

दिवस तिसरा

तिसरी आदिशक्ती: 'चंद्रघंटा' (तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र)
रूप: शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत.
देवी: श्री लक्ष्मी
देवीचे तत्व: अग्नी
वाहन: वाघ
रंग : पिवळा
तत्वाशी संबधित आकार: ३ बंद पाकळ्या
साधना: साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट होते
मंत्र : 
पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।।
प्रसाद तनुते महां चंद्रघंटेती विश्रुत।।


नऊ दिवसाचे नऊ गोल

आजचा रंग: पिवळा ||  गोल: तिसरा ||  आकार: ३ बंद पाकळ्या


One should continuously(beaded rosary)control the fire(solar plexus) within by using our sharp intelligence(sword)and balancing the mind(trishul)by focusing on one point(arrow and bow) practising detached attachment(lotus),accepting things as they are(kamandalu) and killing the negative energies by using gada(power) when needed. 




Wednesday, 14 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस दुसरा

नवरात्र साजरे करण्यामागचे कारण मार्कंडेय पुराणामध्ये देवी महात्म्यात सांगितले आहे. जगात तामसी व क्रूर लोकांची संख्या वाढून ते इतरांना त्रास देऊ लागतात तेव्हा सज्जनांना त्रासमुक्त करण्यासाठी, त्यांना त्यांचे स्थान पुन्हा मिळवून देण्यासाठी शक्तीदेवता या धरतीवर अवतीर्ण होते. आपण आपल्यातल्या वाईट गुणांना घालवायचे बळ मिळण्याकरता नवरात्र केले पाहिजे. आपल्यातील उर्जा-शक्ती परत मिळवण्यासाठी केले पाहिजे.

आपण रोज झोपून सकाळी उठतो तेंव्हा आपल्याला विश्रांती झाल्यामुळे प्रसन्न वाटते. झोपल्यानंतर जशी आपली शारीरिक विश्रांती होते तशीच मानसीकही होते.(खरतर म्हणून आपल्याला जास्त fresh वाटते.) नवरात्रीचा उद्देश्य हाच आहे की आपण बहिर्मुखता टाकून अंतर्मुख व्हावे. वर्षातील हा असा काळ आहे जेंव्हा आपण स्वतःसाठी ( आध्यात्मिक उन्नतीकरता) मेहनत करायची आहे. शारीरिक, वाचिक व मानसिक शुद्धीसाठी उपास, मौन आणि ध्यान करायचे आहे. जेणेकरून आपली अंतर्बाह्य शुद्धी होईल आणि आपण प्रसन्न (  rejuvenate) होऊन वर्षभराकरता परत तयार होऊ. देवीनी साऱ्या असुरांशी युद्ध केले तसेच आपण आळस, गर्व, आसक्ती, लाज, अहंकार, मत्सर, क्रोध ह्या आपल्या आत असणाऱ्या असुरांशी लढायचे आहे. त्याकरता अंतर्बाह्य शुद्धीची आवश्यकता आहे. बाह्य विश्वात तर आपण सारखेच बुडलेले असतो पण ही आपल्या आत बुडण्याची संधी आपल्याला हा उत्सव देतो. वातावरणामध्येही खूप बदल होत असतात( हिवाळ्याची सुरुवात ) त्या बदलानाही सामोरे जाण्यासाठी सात्विक अन्न खाण्याची गरज असते. शरीराला सुंदर बनवण्यासाठी पार्लर किंवा स्पा मध्ये जातात. जर शरीराला इतक्या maintenance ची गरज आहे तर मनाला कितीतरी पटीने जास्त गरज आहे. त्यामुळे मनाला सुंदर बनवण्यासाठी शास्त्रामध्ये मौन, जपसाधना आणि ध्यान सांगितले आहे जे ह्या काळात करतात. थोडक्यात हा जरी उत्सव असला तरी वेगवेगळ्या मार्गांनी उर्जा-शक्ती मिळवण्याचा काळ (period) आहे.

दिवस दुसरा: 

दुसरी आदिशक्ती:' ब्रम्हचारिणी(तपाचे आचरण करणारी)
रूप: या दुर्गेच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हाता कमंडलू आहे
देवीचे तत्व: आकाश
रंग : निळा
तत्वाशी संबधित आकार: १ पाकळी
साधना: मन 'स्वाधिष्ठान' चक्रात स्थिर करतात 
मंत्र : 
दधाना करपदमाभ्यामक्षमालाकमंडलू।
देवी प्रसिदतु मयि ब्रम्हाचारिण्यनुमत्तमा।।

नऊ दिवसाचे नऊ गोल 
आजचा रंग: निळा ||  गोल: दुसरा ||  आकार: १ पाकळी

Tuesday, 13 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस पहिला


आपल्या सर्वांना नवरात्राची कथा काय हे आपल्या आईवडिलांनी सांगितले, ते असे की रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदमुनींनी रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले. अजून एक कथा सांगितली जाते ती अशी की देव आणि दानवांमध्ये युद्ध चालू होते आणि काही केल्या देव, दानवांचा पराभव करू शकत नव्हते. तेंव्हा सर्व देवानी देवीला आवाहन केले व देवीचा विजय व्हावा म्हणून देव अनुष्ठानाला बसले. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले.(तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले).
प्रत्येक घरी शास्त्रानुसार घटस्थापना केली जाते व दीप अखंड तेवत ठेवला जातो. या दिवसापासून संत-महंतांच्या योग साधनेला सुरवात होते.
कथेमधून आपण असा बोध घेऊ शकतो की देव आणी दानव हे symbolic आहेत. जश्या बाहेर चांगल्या आणि दृष्ट प्रवृत्ती आहेत तश्याच आपल्या आतही चांगले आणिवाईट गुण आहेत. नेहमी चांगल्या व दृष्ट प्रवृत्ती यांचा लढा चालू असतो. जसे देवानी देवीला पाचारण केले तसेच आपण आपल्या आतल्या देवीला(शक्तीला) पाचारण करायचे आहे. आपणच आपल्या वाईट गुणांवर विजय मिळवायचा आहे. सगळ्यात मोठा असुर महिषासुर (म्हणजे आळस) त्याला मारायला शक्तीला आळवायचे आहे. नवरात्रामध्ये शारीरिक, वाचीक, मानसिक शुद्धीसाठी वेगवेगळे नेम केले जातात.( ते का करायचे आणी बरेच काही पुढच्या ९ दिवसात आपण पाहू ). त्याप्रमाणे मी सुद्धा नवरात्रीतील दिवसाप्रमाणे माहिती लिहायचा व मंडला काढायचा नेम केला आहे.

दिवस पहिला

पहिली आदिशक्ती: 'शैलपुत्री' (पर्वतराज हिमालयाची मुलगी)
रूप: या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे
वाहन : नंदी
देवी: श्री दुर्गादेवी
देवीचे तत्व: पृथ्वी
रंग : लाल
तत्वाशी संबधित आकार: ३ पाकळ्या
साधना: मन 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात 
मंत्र : 
वंदे वाद्द्रिछतलाभाय चंद्रार्धकृतशेखराम |
वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशस्विनीम्‌ ||







नवरात्रीमधील दिवसाचा रंग व तत्वाशी संबधित आकार हे घेऊन मंडला काढला आहे.

Monday, 25 May 2015

सद्गुरुप्राप्ती

सद्गुरुप्राप्ती म्हणजे पूर्वसुकृताचे फळ
सद्गुरुप्राप्ती म्हणजे कार्यसिद्धीचे बळ||

सद्गुरुप्राप्ती म्हणजे मातेचा प्रेमळ ओलावा
सद्गुरुप्राप्ती म्हणजे चित्तशुद्धीचा ठेवा ||

सद्गुरुप्राप्ती म्हणजे जीवनाची सार्थकता
सद्गुरुप्राप्ती ने संपेल ज्ञानाची व्याकुळता ||

सद्गुरुप्राप्ती ने येते स्व-स्वरुपाची प्रचीती
सद्गुरुप्राप्ती ने होते दिव्य आध्यात्मिक जागृती ||

सद्गुरुप्राप्ती म्हणजे अक्षय आनंदाचा ठेवा
सद्गुरुप्राप्ती म्हणजे सायुज्यमुक्ती सकल जीवा ||


Tuesday, 17 March 2015

Use and throw

लेखाच्या नावावारुनंच माझा रोख कुठे आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल. हा लेख साधारण वय वर्षे ३५-५० मधील लोक जास्ती रिलेट करू शकतील. कारण ह्या लोकांनी आपल्या आई-बाबांची पिढी ही जवळून पहिली आहे आणी पुढची पिढीही. ह्या दोहोंच्या विचारसरणी मध्ये आणी वस्तू वापरण्याच्या पद्धतीमध्ये खूपच फरक आहे.
आई-बाबांच्या पिढी मध्ये कुठलीही वस्तू मग ती scooter/cycle/car/fridge/TV/phone  अगदी cooker/gas ह्या वस्तू एकदा का घरी आल्या त्या कायमच्या राहायच्या. काही जर बिघाड झालाच तर लगेच दुरुस्ती करून परत वापरल्या जायच्या. कारण वस्तू निर्जीव असल्या तरी त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सजीव असायचा. त्या प्रत्येक वस्तूबरोबर काहीतरी आठवण जोडली गेलेली असायची. वाढदिवस / भाऊबीज / पाडवा / बढती ह्या अश्या वेगवेगळ्या निमित्याने घेतल्या गेल्यामुळे त्या निर्जीव वस्तूंना हि अस्तित्व होते. त्यामुळे त्यांची जीवापाड काळजी घेतली जायची. त्या वेळच्या वस्तूही दणकट असायच्या. आजोबांनी वापरलेली सायकल नातवापर्यंत म्हणजे जवळजवळ ५०-६० वर्षे वापरली जायची. थोड्या फार फरकाने हीच गोष्ट सगळ्या वस्तूंची. दुरुस्तीचा खर्चही किरकोळ असायचा त्यामुळे डागडुजी करून वस्तू पिढ्यानपिढ्या वापरल्या जायच्या. प्रत्येक गोष्ट खरेदी करताना त्याच्या उपयुक्ततेचा आणी किमतीचा विचार केला जायचा.
GenNext चे आयुष्य पाहता वस्तू वापरायच्या आणी फेकून द्यायच्या. दुरुस्तीची भानगड नाही. Use and Throw चा जमाना आलाय असे वाटते. याची कारणे अशी असू शकतील - पैशाची सुबत्ता आलीय, वस्तू तकलादू आहेत / वस्तूंची variety and availability आहे. काही वेळेला वापरायचा कंटाळा आला म्हणून हेही कारण असते. TV/ Fridge/ Cars सुद्धा लोक ७-८ वर्षांनी बदलतात. कपडे, चपला तर काही विचारूच नका. आजची पिढी उपयुक्ततेचा आणी किमतीचा विचार न करता फक्त आवडीचा विचार करते , जी बहुतेक वेळा क्षणिक असते.
आपण ह्या २ पिढ्यांचा दुवा - मधली पिढी - दोघांच्या कात्रीत सापडलेली. सगळ्यांचे बरोबर आहे असे वाटणारी पिढी. आपल्या आईवडिलांनी आपल्यापुढे कधीच पैशाचा हिशोब मांडला नाही व मर्यादाही सांगितल्या नाहीत पण त्या आपल्यापर्यंत नेहमी पोचल्या. आईवडिलांचा संसार उभारताना पाहिलेली पिढी त्यामुळे प्रत्येक वस्तूशी आपलीही attachment पण समृद्धी आल्यामुळे मुलांचे हट्ट हि पुरवायला लागलो आणी त्यांचेही logic पटायला लागले. मुलानाही ते अगदी सहज मिळाल्यामुळे त्याची किंमत वाटत नाही. भरपूर पैसे मिळवायचे आणी भरपूर खर्च करायचे हे जीवनाचे सूत्र झालेय. परमेश्वराजवळ एकच प्रार्थना आहे की हि नवी पिढीची वापरणे आणी फेकून देण्याची वृत्ती वस्तू पुरती मर्यादित राहो नातेसंबध मध्ये न येवो.

(खरतर हा विषय प्रचंड मोठा आहे. हि पोस्ट लिहिण्या मागचा उद्देश्य फक्त use and throw हा विचार मांडण्याचा आहे. तुम्ही तुमचे विचार जरूर कळवा.)

Thursday, 1 January 2015

My new oil painting - new hobby
I wish all viewers of this blog HAPPY NEW YEAR 2015
May this year brings you happiness, health, piece of mind.


Monday, 1 December 2014

||विठ्ठल विठ्ठल||

Inspiration: तुकाराम महाराजांचा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल अभंग

बोलावा विठ्ठल | पहावा विठ्ठल|
वाचावा विठ्ठल| रोजदिशी ||१||
ऐकावा विठ्ठल| करावा विठ्ठल|
स्मरावा विठ्ठल| क्षणोक्षणी ||२||
पहावे नाटक | चालले जगाचे|
धरावे विठ्ठलाचे | बोट घट्ट ||३||
पुसूनिया काजळी | अज्ञानाची काळी|
भरावा विठ्ठल| अंतःकरणात ||४||
टाकुनिया मोह| विषय वासना|
उरावा विठ्ठल| अंतर्बाह्य||५||
साध्य विठ्ठल| साधन विठ्ठल|
साधक विठ्ठल| होऊन जावे||६||

Thursday, 20 November 2014

न-मन

नाम हाच नेम | नाम हेच व्यवधान |
नाम हेच साध्य | नाम हेच साधन||१||

नाम-रूप असे भिन्न | नामातून रूप होतसे उत्पन्न|
रूप असो वा नसो| नाम असे चिरंतन||२||

नाम हीच एक कृती | नाम हीच असे भक्ती|
नामातच सद्संगती | नामानेच शक्य होईल मुक्ती||३||

नाम म्हणजे अखंड अनुसंधान | कर भगवंताच्या स्वाधीन मन |
ऐसे भगवंताचे आश्वासन | मन मग होईल 'न-मन '||४||

अखंड चालो नामघोष| नामाग्नी जाळेल पाप-दोष |
नामानेच मिळेल भगवंत प्रत्यक्ष| मुखी नाम हाती मोक्ष||५||

Monday, 27 October 2014

नादब्रम्ह

सप्तसूर संगीताचे
झंकारले स्वर संवादिनीचे
आरोह- अवरोह अलंकार रागांचे
सुर- लय -ताल बहरती गाण्याचे
साकारले मग गीत मनाचे
हेच असे साध्य साधनेचे
साधनेतून नादब्रह्म साकारायचे
नादब्रह्म हे ओजस्वी ओंकाराचे
ज्योतिर्मय ब्रम्ह  तून गाठायाचे
अन स्वतःच नादब्रम्ह होउन जायचे