Sunday, 18 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस सहावा

 देवी तत्व
आपण जेंव्हा आजूबाजूला सृष्टी पाहतो - मनुष्य, प्राणी, पक्षी, वनस्पती, ग्रह, तारे, इत्यादी. तेंव्हा आपल्या मनात नक्कीच विचार येतात की हे सर्व कसे झाले असेल? कशापासून तयार झाले असेल? कोणी बनवली असेल? वगैरे. ह्याला शास्त्रामध्ये ' कार्यकारण सिद्धांत ' असे  म्हणतात- " कारणम विना कार्य न सिद्धती| "
आता एक घटाचे उदाहरण घेऊया
१. घट(कार्य) हा मातीपासून(कारण) बनलेला असतो. मातीशिवाय तो बनूच शकत नाही. पण माती स्वतः त्याला बनवू शकत नाही.
२. त्यासाठी कोणीतरी skilled person(कर्ता) लागतोच.
३. घट तयार (उत्पत्ती) होतो, वापरात(स्थिती) येतो आणि नंतर फुटतो(लय) पावतो. म्हणजे घट हा आधी माती होता आणि फुटल्यावर मातीच होणार. म्हणजे माती(कारण) हेच तिन्ही काळात सत्य आहे.
४. जे मातीचे गुणधर्म आहेत तेच घटात असणार. घटाचे वेगवेगळे आकार व त्याप्रमाणे नावे असतात, जसे रांजण, माठ, घट इत्यादी.
जर घटासारख्या अचेतन गोष्टीलाही कारण आणि कर्ता आहे तर मनुष्य, प्राणी, वनस्पती, निसर्ग, ग्रह, तारे ह्या सर्व सृष्टीला सुद्धा कारण आणि कर्ता असायलाच पाहिजे.
हेच logic जर आपण सृष्टीला लावले तर
१. सर्व सृष्टी -मनुष्य, प्राणी, वनस्पती, निसर्ग, ग्रह, तारे(कार्य) हे पंचमहाभूते आणि त्रिगुण (कारण) यापासून बनलेले आहे.
२. हे सर्व जिचे कार्य आहे ती प्रकृती - देवी (कर्ता) असली पाहिजे.
३. सृष्टीतील सर्वाना उत्पत्ती, स्थिती, लय आहे.
४. जे प्रकृतीमध्ये आहे तेच सर्व सृष्टीमध्ये आहे.

ह्यावरून असेच म्हणता येईल की असे एक तत्व आदिकालापासून आहे जे ह्या साऱ्या सृष्टीचा उत्पत्ती (Generator), स्थिती(Operator), लय(Destroyer) आहे. ज्याला आपण देवी तत्व म्हणतो. हे सगळे आपल्या सारख्या सगळ्यांच्या बुद्धीला पटावे म्हणून आपण आपल्याला आवडेल अशी तिची प्रतिमा तयार केली, वेगवेगळी नावे दिली व तिला आपल्या स्वभावाप्रमाणे वेगवेगळ्या रुपात पुजायला लागलो. जसे शक्ती, लक्ष्मी, सरस्वती, अंबामाता, पार्वती, कालीमाता,पद्मावती वगैरे. हे देवीतत्व आपल्या सर्वांमध्ये आहे. नवरात्रीमध्ये आपण ह्याच देवीतत्वाला आवाहन करतो आणि स्वतःला तिच्या अस्तित्वाची आठवण करून देतो.



दिवस सहावा:

सहावी आदिशक्ती: 'कात्यायनी' (प्रसिद्ध महर्षी कात्यायनानी भगवतीची कठोर तपस्या केली.भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.)
रूप: चारभुजाधारी- देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे.
देवी: श्री लक्ष्मी
देवीचे वाहन: सिंह
रंग : केशरी
तत्वाशी संबधित आकार: फुलाची पाकळी
साधना: मन 'आज्ञा' चक्रात स्थिर करतात 
मंत्र : ओंकार जपसाधना

नऊ दिवसाचे नऊ गोल
आजचा रंग: केशरी ||  गोल: सहावा ||  आकार: फुलाची पाकळी



Saturday, 17 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस पाचवा



प्रकृती ही आठ गोष्टीनी बनलेली असते म्हणून तिला अष्टधा प्रकृती म्हणतात - पंचमहाभूते+त्रिगुण. प्रकृतीमध्ये जन्मलेला प्रत्येकजण( मनुष्य, प्राणी, वनस्पती) हा तीन गुणांनी बनलेला असतो - सत्व, रज आणि तम. भगवंताची करणी अगाध आहे की जरी सर्वजण अष्टधा प्रकृतीचे असले तरी प्रत्येकजण वेगळा आहे. प्रत्येकजण जन्माला येताना ह्या ३ गुणांचे combination घेऊन येतो व त्या गुणांच्या प्रभावाप्रमाणे वागतो. आपण आजूबाजूला पाहिले असता आपल्या लक्षात येईल की माणसांच्या आवडीनिवडी, स्वभाव, विचार आणि वागणे हे त्रिगुणांच्या combination वर अवलंबून असतात.
सर्वसाधारणपणे ह्या त्रिगुणांचा प्रभाव असा दिसून येतो-
१. सात्विक:  दयाळू, कनवाळू, दुसऱ्याचा विचार करणारे, संवेदनशील, शांत, निर्गर्वी, काहीही अपेक्षा न ठेवता मदत करणारे, समाधानी, आनंदी, निर्भयी, क्षमाशील आणि उत्साही
२. राजस: सतत काहीतरी करावे वाटणारे, चंचल, शूर, पराक्रमी, गर्विष्ठ, मत्सरी, अपेक्षा ठेऊन मदत करणारे, लीडर, असंतुष्ट, सगळ्या गोष्टीत आसक्ती आणि प्रत्येक गोष्टीची कामना करणारे
३. तामस: आळशी, स्वार्थी, कावेबाज, कुणालाही मदत न करणारे, फक्त स्वतःचा विचार करणारे, निरुत्साही आणि सतत दुःखी
(हे वर्णन ठोकळमनाने दिले आहे - सगळे वर्णन करणे इथे शक्य नाही)
१००% सात्विक कुणीच नसते. सगळेजण ह्यापैकी २ व ३ गुणांचे combination घेऊन जन्मतात. प्राणी आणि वनस्पती यांना जन्मल्यावर ह्या combination मध्ये बदल करता येत नाही पण भगवंताने हे स्वातंत्र फक्त माणसाला दिले आहे. जन्माला येताना कसाही आला तरी बुद्धी असल्यामुळे आपल्या स्वभावात, वागण्यात त्याला बदल करता येतो. (आपल्या गुणांचा त्याग करता येत नाही) जेणेकरून रज आणि तमोगुण कमी करून perfection च्या दिशेने म्हणजे त्याला सात्विक होता येते. एकावेळी एका गुणाचा प्रभाव आपल्यावर असतो. आपण स्वतःचे निरीक्षण केले तर लक्षात येईल की आपण काही प्रसंगी चांगले वागतो तर काही प्रसंगी नाही ह्याचे कारण जेंव्हा आपण चांगले वागतो तेंव्हा आपल्यावर सात्विक गुणाचा प्रभाव असतो. आपण साधना ह्याच गोष्टींकरता करायची की जेणेकरून सात्विक गुण नेहमीच बाकी दोन्ही गुणांना suppress करेल. खरेतर जीवन जगायला ह्या तिनही गुणांची गरज आहे.
सात्विक होण्यासाठी आपल्यात असणाऱ्या सात अवगुणांना weak करावे लागेल - कामना, क्रोध, मद, मोह, मत्सर, आसक्ती आणी अहंकार
नवरात्रीमध्ये साधना पहिले ३ दिवस शक्ती(तमास गुणांवर विजय), नंतरचे ३ दिवस लक्ष्मी(राजस गुणांवर विजय आणि शेवटचे ३ दिवस सरस्वती( सत्वगुण वृद्धी) साठी करायची आहे.

काल सांगितल्याप्रमाणे, जर पूर्ण आनंद, समाधान आणि शांती हवी असेल म्हणजे नारायणाची प्राप्ती करायची असेल तर आधी सात्विक होण्याकडे आणि नंतर निर्गुण होण्याकडे वाटचाल करावी लागेल.

दिवस पाचवा:

पाचवी आदिशक्ती: 'स्कंदमाता
रूप: चारभुजाधारी - दोन हातामध्ये कमळ, एक हात आशीर्वादासाठी आणि एका हाताने स्कंदाला म्हणजे कार्तिकेयाला धरले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे.
देवी: श्री लक्ष्मी
देवीचे वाहन: सिंह
रंग : करडा- ग्रे
तत्वाशी संबधित आकार: चक्र
साधना: मन 'विशुद्ध' चक्रात स्थिर करतात 
मंत्र : 
सिंहासनगता नित्य पदमाश्रितकरद्वया|
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी||

नऊ दिवसाचे नऊ गोल
आजचा रंग: करडा - ग्रे ||  गोल: पाचवा ||  आकार: चक्र


Friday, 16 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस चौथा


शास्त्रामध्ये असे लिहिले आहे की नवरात्रातील पहिले तीन दिवस दुर्गा, नंतरचे तीन दिवस लक्ष्मी आणि शेवटचे तीन दिवस सरस्वतीचे पूजन केले जाते. खरे पाहिले तर पूर्ण ९ दिवस देवी तत्वाचीच पूजा केली जाते, पण वेगवेगळ्या रुपात अनुक्रमे शक्ती, समृद्धी/संपत्ती आणि ज्ञान(विद्या) रुपात पूजा केली जाते.

आज नवरात्रीचा चौथा दिवस - लक्ष्मीचे पूजन
आपण लक्ष्मी म्हटले की डोळ्यापुढे येतो तो पैसा किंवा धन. ज्याची आपल्या चरितार्थासाठी अत्यंत गरज आहे. धनासाठी लक्ष्मीची पूजा करणे वाईट नाही किंवा धनवान होणे हेही वाईट नाही, पण शास्त्रामध्ये लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा/धन असा मर्यादित अर्थ नाही. ( It has broad meaning) लक्ष्मी म्हणजे ज्ञानाची, कौशल्याची, कलेची आणि गुणांची समृद्धी. ( Both material and spiritual wealth )
पुराणामध्ये असा उल्लेख आहे की लक्ष्मी ही खालील आठ प्रकारांनी आपल्या आयुष्यात येते -
१. आदिलक्ष्मी : बळ आणि शांती
२. धनलक्ष्मी: धन
३. विद्यालक्ष्मी: गुण व कौशल्य
४. धान्यलक्ष्मी: अन्न
५. संतानलक्ष्मी: संतती आणि सृजनशीलता
६. धैर्यलक्ष्मी: धैर्य
७. विजयालक्ष्मी: यश
८. भाग्यलक्ष्मी: भाग्य आणि भरभराट
आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर ह्यातील प्रत्येकीची आवश्यकता भासते.

असे म्हणतात की लक्ष्मी ही चंचल असते. खरतर लक्ष्मी चंचल नसते. लक्ष्मी आल्यामुळे माणसात जे बदल घडतात त्यामुळे तो चंचल होते. जेंव्हा लक्ष्मी येते तेंव्हा मानवी स्वभावानुसार चंचलता, अहंकार, हाव, मत्सर, असूया व अशांती अनुक्रमे येतात. जिथे अशांती आहे तिथे लक्ष्मी रहात नाही. With power comes a responsibility ह्याप्रमाणे लक्ष्मी आल्यानंतर वरील पैकी कुठल्याही दुर्गुणाची आपल्याला बाधा होऊ नये म्हणून कष्ट घेतले पाहिजेत. म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात कायमचा निवास करेल. जिथे नारायण (सुख-समाधान-शांती) आहे तिथून लक्ष्मी जाऊच शकत नाही.
लक्ष्मीचे असे वर्णन आहे की तिला चार हात (धर्म, अर्थ, काम, मोक्ष) आहेत. ती कमळावर बसली आहे. लक्ष्मी ही चांगल्या मार्गांनी यावी, कुणाला न फसवता, न लुबाडता यावी. कितीही लक्ष्मी असेल तरी हाव व आसक्ती नसावी व त्याचा वापर फक्त स्वतःसाठी न होता समाजासाठी आणि गरजूंसाठी व्हावा. म्हणजे लक्ष्मी प्रसन्न नक्कीच होईल.

आपल्या सर्वाना ह्या अष्टलक्ष्मी प्रसन्न होवोत हीच तिच्या चरणी प्रार्थना.


चौथी आदिशक्ती: 'कुष्मांडा(आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते.)
रूप: अष्टभुजा- तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा आहे.
देवी: श्री लक्ष्मी
देवीचे वाहन: सिंह
देवीचे तत्व: वायू
रंग : हिरवा
तत्वाशी संबधित आकार: गोपद्म
साधना: मन 'अनाहत' चक्रात स्थिर करतात 
मंत्र : 
सुरासम्पूर्णकलशं रूधिराप्लुतमेंव च।
दधाना हस्तपदमाभ्यां कुष्मांडा शुभदास्तु में।।



नऊ दिवसाचे नऊ गोल
आजचा रंग: हिरवा ||  गोल: चौथा ||  आकार: गोपद्म सारखे चिन्ह


Thursday, 15 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस तिसरा


प्रत्येक घरी शास्त्रानुसार घटस्थापना केली जाते आणि पूर्ण ९ दिवस नंदादीप अखंड तेवत ठेवला जातो. शक्तीचे रूप तेजोमय आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अग्नी किंवा दीपाला आगळे स्थान आहे. प्रत्येक मंगल कार्याच्या सुरुवात दीप प्रज्वलनाने होते. अग्नीच्या योगाने देवाला आळवावे ही प्रथा जुनी आहे. अग्नी वा ज्योतीला सर्वात पवित्र वस्तू मानले आहे. अग्नी अशुद्ध गोष्टी शुद्ध करतो. ज्योत प्रकाश देते व अंधाराकडून प्रकाशाकडे नेते. ज्योत हे ज्ञानाचे सुद्धा प्रतिक आहे. अखंड नंदादीप लावण्यामागचे कारण असे की आपल्यामध्येही एक ज्योत(आत्मज्योत) आहे ज्याचा आपल्याला विसर पडलेला आहे त्याची सतत आठवण राहावी ज्यायोगे आपण त्या आत्मज्योतीचा शोध घेऊ व त्याप्रमाणे साधना करू. (नवरात्रीचा काळ हा साधनेसाठी व आत्मशोधासाठी आहे) कुठल्याही साधनेमध्ये अहंकार रहित होणे हे महत्वाचे मानतात. कारण अहंकार हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जेंव्हा अखंड ज्योत  तेवत ठेवतो तेंव्हा ती अहंकार जाळण्याची आठवण करून देते. (दिवा हे देहाचे व वात अहंकाराचे प्रतिक) अहंकार जाळला किंवा नष्ट झाला तरच आपल्या आतल्या ज्योतीचे दर्शन होणे शक्य आहे. बरेच जणांचा ह्यावर आक्षेप असतो की खूप तेल वाया जाते त्यापेक्षा गरिबाला द्यावे वगैरे.(पण असे म्हणणारे लोक ना दिवा लावतात ना गरिबांना देतात)  मलाही वाटते की जर एखाद्याची ऐपत नसेल तर त्यांनी हे करू नये. शेवटी भाव महत्वाचा. पण जे लोक बाकीच्या ठिकाणी प्रचंड उधळपट्टी करतात त्यांनी फक्त देवाच्या पुढे दिवा लावण्याच्या बाबतीत काटकसर करू नये. देवालाही कुठलीच अपेक्षा नसते. पण ह्या सगळ्या procedural गोष्टी करण्यामागे भावनिर्मिती करणे हा सुद्धा उद्देश्य आहे. दिवा लावण्यामुळे पवित्र वातावरण निर्मिती होते. (हे देवाकरता नसून आपल्या स्वतःकरता आहे ) साधनेमध्ये जेंव्हा प्रगती होईल तेंव्हा कुठल्याही उपचारांची आवश्यकता राहणार नाही पण तोपर्यंत हे सगळे करणे जरुरीचे आहे आपल्याला सगळ्या गोष्टींची आठवण करून देण्याकरता आणि त्या अंगवळणी पडण्याकरता. जेंव्हा आपण ह्या सगळ्या procedural गोष्टी भावपूर्ण होऊन करू, समजून व उमजून करू तेंव्हाच त्याचे खरे फळ मिळेल.

दिवस तिसरा

तिसरी आदिशक्ती: 'चंद्रघंटा' (तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र)
रूप: शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातामध्ये खड्ग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत.
देवी: श्री लक्ष्मी
देवीचे तत्व: अग्नी
वाहन: वाघ
रंग : पिवळा
तत्वाशी संबधित आकार: ३ बंद पाकळ्या
साधना: साधकाचे मन 'मणिपूर' चक्रात प्रविष्ट होते
मंत्र : 
पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।।
प्रसाद तनुते महां चंद्रघंटेती विश्रुत।।


नऊ दिवसाचे नऊ गोल

आजचा रंग: पिवळा ||  गोल: तिसरा ||  आकार: ३ बंद पाकळ्या


One should continuously(beaded rosary)control the fire(solar plexus) within by using our sharp intelligence(sword)and balancing the mind(trishul)by focusing on one point(arrow and bow) practising detached attachment(lotus),accepting things as they are(kamandalu) and killing the negative energies by using gada(power) when needed. 




Wednesday, 14 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस दुसरा

नवरात्र साजरे करण्यामागचे कारण मार्कंडेय पुराणामध्ये देवी महात्म्यात सांगितले आहे. जगात तामसी व क्रूर लोकांची संख्या वाढून ते इतरांना त्रास देऊ लागतात तेव्हा सज्जनांना त्रासमुक्त करण्यासाठी, त्यांना त्यांचे स्थान पुन्हा मिळवून देण्यासाठी शक्तीदेवता या धरतीवर अवतीर्ण होते. आपण आपल्यातल्या वाईट गुणांना घालवायचे बळ मिळण्याकरता नवरात्र केले पाहिजे. आपल्यातील उर्जा-शक्ती परत मिळवण्यासाठी केले पाहिजे.

आपण रोज झोपून सकाळी उठतो तेंव्हा आपल्याला विश्रांती झाल्यामुळे प्रसन्न वाटते. झोपल्यानंतर जशी आपली शारीरिक विश्रांती होते तशीच मानसीकही होते.(खरतर म्हणून आपल्याला जास्त fresh वाटते.) नवरात्रीचा उद्देश्य हाच आहे की आपण बहिर्मुखता टाकून अंतर्मुख व्हावे. वर्षातील हा असा काळ आहे जेंव्हा आपण स्वतःसाठी ( आध्यात्मिक उन्नतीकरता) मेहनत करायची आहे. शारीरिक, वाचिक व मानसिक शुद्धीसाठी उपास, मौन आणि ध्यान करायचे आहे. जेणेकरून आपली अंतर्बाह्य शुद्धी होईल आणि आपण प्रसन्न (  rejuvenate) होऊन वर्षभराकरता परत तयार होऊ. देवीनी साऱ्या असुरांशी युद्ध केले तसेच आपण आळस, गर्व, आसक्ती, लाज, अहंकार, मत्सर, क्रोध ह्या आपल्या आत असणाऱ्या असुरांशी लढायचे आहे. त्याकरता अंतर्बाह्य शुद्धीची आवश्यकता आहे. बाह्य विश्वात तर आपण सारखेच बुडलेले असतो पण ही आपल्या आत बुडण्याची संधी आपल्याला हा उत्सव देतो. वातावरणामध्येही खूप बदल होत असतात( हिवाळ्याची सुरुवात ) त्या बदलानाही सामोरे जाण्यासाठी सात्विक अन्न खाण्याची गरज असते. शरीराला सुंदर बनवण्यासाठी पार्लर किंवा स्पा मध्ये जातात. जर शरीराला इतक्या maintenance ची गरज आहे तर मनाला कितीतरी पटीने जास्त गरज आहे. त्यामुळे मनाला सुंदर बनवण्यासाठी शास्त्रामध्ये मौन, जपसाधना आणि ध्यान सांगितले आहे जे ह्या काळात करतात. थोडक्यात हा जरी उत्सव असला तरी वेगवेगळ्या मार्गांनी उर्जा-शक्ती मिळवण्याचा काळ (period) आहे.

दिवस दुसरा: 

दुसरी आदिशक्ती:' ब्रम्हचारिणी(तपाचे आचरण करणारी)
रूप: या दुर्गेच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हाता कमंडलू आहे
देवीचे तत्व: आकाश
रंग : निळा
तत्वाशी संबधित आकार: १ पाकळी
साधना: मन 'स्वाधिष्ठान' चक्रात स्थिर करतात 
मंत्र : 
दधाना करपदमाभ्यामक्षमालाकमंडलू।
देवी प्रसिदतु मयि ब्रम्हाचारिण्यनुमत्तमा।।

नऊ दिवसाचे नऊ गोल 
आजचा रंग: निळा ||  गोल: दुसरा ||  आकार: १ पाकळी

Tuesday, 13 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस पहिला


आपल्या सर्वांना नवरात्राची कथा काय हे आपल्या आईवडिलांनी सांगितले, ते असे की रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदमुनींनी रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले. अजून एक कथा सांगितली जाते ती अशी की देव आणि दानवांमध्ये युद्ध चालू होते आणि काही केल्या देव, दानवांचा पराभव करू शकत नव्हते. तेंव्हा सर्व देवानी देवीला आवाहन केले व देवीचा विजय व्हावा म्हणून देव अनुष्ठानाला बसले. महिषासुर नावाच्या असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने नवमीला रात्री असुराला मारले.(तेव्हापासून तिला महिषासुरमर्दिनी म्हणू लागले).
प्रत्येक घरी शास्त्रानुसार घटस्थापना केली जाते व दीप अखंड तेवत ठेवला जातो. या दिवसापासून संत-महंतांच्या योग साधनेला सुरवात होते.
कथेमधून आपण असा बोध घेऊ शकतो की देव आणी दानव हे symbolic आहेत. जश्या बाहेर चांगल्या आणि दृष्ट प्रवृत्ती आहेत तश्याच आपल्या आतही चांगले आणिवाईट गुण आहेत. नेहमी चांगल्या व दृष्ट प्रवृत्ती यांचा लढा चालू असतो. जसे देवानी देवीला पाचारण केले तसेच आपण आपल्या आतल्या देवीला(शक्तीला) पाचारण करायचे आहे. आपणच आपल्या वाईट गुणांवर विजय मिळवायचा आहे. सगळ्यात मोठा असुर महिषासुर (म्हणजे आळस) त्याला मारायला शक्तीला आळवायचे आहे. नवरात्रामध्ये शारीरिक, वाचीक, मानसिक शुद्धीसाठी वेगवेगळे नेम केले जातात.( ते का करायचे आणी बरेच काही पुढच्या ९ दिवसात आपण पाहू ). त्याप्रमाणे मी सुद्धा नवरात्रीतील दिवसाप्रमाणे माहिती लिहायचा व मंडला काढायचा नेम केला आहे.

दिवस पहिला

पहिली आदिशक्ती: 'शैलपुत्री' (पर्वतराज हिमालयाची मुलगी)
रूप: या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे
वाहन : नंदी
देवी: श्री दुर्गादेवी
देवीचे तत्व: पृथ्वी
रंग : लाल
तत्वाशी संबधित आकार: ३ पाकळ्या
साधना: मन 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात 
मंत्र : 
वंदे वाद्द्रिछतलाभाय चंद्रार्धकृतशेखराम |
वृषारूढां शूलधरां शैलपुत्री यशस्विनीम्‌ ||







नवरात्रीमधील दिवसाचा रंग व तत्वाशी संबधित आकार हे घेऊन मंडला काढला आहे.