Wednesday, 22 January 2014

रामायण

आपुलिया अंतरात रोज घडे रामायण
करे हरण मनरूपी सीतेचे, अहंकाररूपी रावण ||

रावण करी सितेभोवती षडरिपुंचे थैमान
असमर्थ असे सीता अन तिचे सुटकेचे प्रयत्न ||

रोज शोधी सीतेसी, विचाररूपी लक्ष्मण
पण व्यर्थ होतसे त्याची हि वणवण ||

मग येई कामी, श्वासरुपी हनुमान
सोडवी चंचल सीतेसी तो निग्रही हनुमान ||

साध योग जिंकूनी शरीर-इंद्रिय-मन
करुनी चित्त एकाग्र आणी प्राणापान समान ||
म्हणेल तथास्तु आत्माराम होऊनिया प्रसन्न
आपुल्या अंतरात रोज घडे रामायण ||

Sunday, 12 January 2014

कर्मरमणी

भगवंतानी जरी सांगितला मार्ग ज्ञान-कर्म-भक्तीचा |
सुरु कर प्रवास,  सोपा व सर्वश्रेष्ठ कर्माचा ||

सामान्य, योगी वा संन्यासी, न सुटे त्यासी कर्म |
ईश्वरभक्तीची ओल असता कर्माचे होईल अकर्म ||

कर कर्म लावूनी, शरीर-मनाचा मेळ |
तुझ्यासाठी होईल, जीवन एक खेळ ||

हर कर्मामध्ये ओत भाव-भावना-ओलावा
करुनी असे कर्म, मिळेल चित्तशुद्धीचा मेवा ||

टाकून कर्तृत्वाचा अहंकार व कर्मफलाची आसक्ती, होईल निष्काम कर्म |
हो कर्मरमणी, घे आनंद कर्माचा, हाची असे स्वधर्म ||

Sunday, 5 January 2014

To my Sisters....

नाते बहिणीबहिणींचे

नाते बहिणीबहिणींचे हे एक सोनेरी साज असते |
प्रेमाच्या राशीवरचे चक्रवाढ व्याज असते ||

नाते बहिणीबहिणींचे काहीसे अबोल असते
शब्दात व्यक्त होणे शक्य नाही पण सागराहून खोल असते ||

नाते बहिणीबहिणींचे हे थोडेसे हट्टी असते |
एका क्षणाला कट्टी तर दुसऱ्या क्षणाला गट्टी असते ||

नाते बहिणीबहिणींचे हे सुरेल गाणे असते |
कधी कोमल गंधार तर कधी शुद्ध निषाद असते ||

नाते बहिणीबहिणींचे आश्वासक मैत्रीचे असते |
कधी वात्सल्याची सोबत तर कधी मायेची ऊब असते ||

नाते बहिणीबहिणींचे आयुष्य सुंदर करते|
कितीही सहवासात असले तरी अजून हवेच असते
असेच नाते धनश्री-स्वप्नाचे, माझ्यासाठी अनमोल असते, माझ्यासाठी अनमोल असते......