Tuesday, 17 March 2015

Use and throw

लेखाच्या नावावारुनंच माझा रोख कुठे आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल. हा लेख साधारण वय वर्षे ३५-५० मधील लोक जास्ती रिलेट करू शकतील. कारण ह्या लोकांनी आपल्या आई-बाबांची पिढी ही जवळून पहिली आहे आणी पुढची पिढीही. ह्या दोहोंच्या विचारसरणी मध्ये आणी वस्तू वापरण्याच्या पद्धतीमध्ये खूपच फरक आहे.
आई-बाबांच्या पिढी मध्ये कुठलीही वस्तू मग ती scooter/cycle/car/fridge/TV/phone  अगदी cooker/gas ह्या वस्तू एकदा का घरी आल्या त्या कायमच्या राहायच्या. काही जर बिघाड झालाच तर लगेच दुरुस्ती करून परत वापरल्या जायच्या. कारण वस्तू निर्जीव असल्या तरी त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सजीव असायचा. त्या प्रत्येक वस्तूबरोबर काहीतरी आठवण जोडली गेलेली असायची. वाढदिवस / भाऊबीज / पाडवा / बढती ह्या अश्या वेगवेगळ्या निमित्याने घेतल्या गेल्यामुळे त्या निर्जीव वस्तूंना हि अस्तित्व होते. त्यामुळे त्यांची जीवापाड काळजी घेतली जायची. त्या वेळच्या वस्तूही दणकट असायच्या. आजोबांनी वापरलेली सायकल नातवापर्यंत म्हणजे जवळजवळ ५०-६० वर्षे वापरली जायची. थोड्या फार फरकाने हीच गोष्ट सगळ्या वस्तूंची. दुरुस्तीचा खर्चही किरकोळ असायचा त्यामुळे डागडुजी करून वस्तू पिढ्यानपिढ्या वापरल्या जायच्या. प्रत्येक गोष्ट खरेदी करताना त्याच्या उपयुक्ततेचा आणी किमतीचा विचार केला जायचा.
GenNext चे आयुष्य पाहता वस्तू वापरायच्या आणी फेकून द्यायच्या. दुरुस्तीची भानगड नाही. Use and Throw चा जमाना आलाय असे वाटते. याची कारणे अशी असू शकतील - पैशाची सुबत्ता आलीय, वस्तू तकलादू आहेत / वस्तूंची variety and availability आहे. काही वेळेला वापरायचा कंटाळा आला म्हणून हेही कारण असते. TV/ Fridge/ Cars सुद्धा लोक ७-८ वर्षांनी बदलतात. कपडे, चपला तर काही विचारूच नका. आजची पिढी उपयुक्ततेचा आणी किमतीचा विचार न करता फक्त आवडीचा विचार करते , जी बहुतेक वेळा क्षणिक असते.
आपण ह्या २ पिढ्यांचा दुवा - मधली पिढी - दोघांच्या कात्रीत सापडलेली. सगळ्यांचे बरोबर आहे असे वाटणारी पिढी. आपल्या आईवडिलांनी आपल्यापुढे कधीच पैशाचा हिशोब मांडला नाही व मर्यादाही सांगितल्या नाहीत पण त्या आपल्यापर्यंत नेहमी पोचल्या. आईवडिलांचा संसार उभारताना पाहिलेली पिढी त्यामुळे प्रत्येक वस्तूशी आपलीही attachment पण समृद्धी आल्यामुळे मुलांचे हट्ट हि पुरवायला लागलो आणी त्यांचेही logic पटायला लागले. मुलानाही ते अगदी सहज मिळाल्यामुळे त्याची किंमत वाटत नाही. भरपूर पैसे मिळवायचे आणी भरपूर खर्च करायचे हे जीवनाचे सूत्र झालेय. परमेश्वराजवळ एकच प्रार्थना आहे की हि नवी पिढीची वापरणे आणी फेकून देण्याची वृत्ती वस्तू पुरती मर्यादित राहो नातेसंबध मध्ये न येवो.

(खरतर हा विषय प्रचंड मोठा आहे. हि पोस्ट लिहिण्या मागचा उद्देश्य फक्त use and throw हा विचार मांडण्याचा आहे. तुम्ही तुमचे विचार जरूर कळवा.)