ह्या ओळी माझ्या सगळ्या भाचरांसाठी......
(बालकविता लिहायचा हा माझा पहिलाच प्रयत्न - चूकभूल माफ करा :))
एके दिवशी म्हणाला चांदोबा आपल्या आईला
शिवून देग मला माझा लोकरीचा झबला ||
रात्रभर सतावतो वारा अन वाजते मला थंडी
आकाशाची सफर करायची पण भरते मला हुडहुडी
आजारी पडतो मी सारखा, हवा न मानवे मला
शिवून देग मला माझा लोकरीचा झबला ||१||
चांदोबाची व्यथा ऐकून आईस वाईट वाटले
काय करावे, कसे करावे हे तिस नाही कळले
एके दिवशी होसी छोटा अन एके दिवशी मोठा
सांग कसा शिवू मी तुला लोकरीचा झबला ||२||
सांग घेऊ माप मी छोटे-मोठे कुठले
की शिऊ मी तुला पंधरा लोकरीचे झबले?
ऐकून चांदोबा झाला खुश, म्हणे चालेल आई मला
शिवून देग मला माझा लोकरीचा झबला ||३||