दैनंदिन जीवनात सावधपणाचे महत्व
मुख्य हरिकथा निरुपण | दुसरे ते राजकारण | तिसरे ते
सावधपण | सर्वांविषयी || ११.५.९
अखंड सावधान असावे | दुश्चित्त कदापि नसावे | तजविजा
करीत बसावे | एकांत स्थळी ||
(संभाजीराजाना उपदेशपर पत्र लिहिले त्यातील एक ओळ )
सावधान हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर उभे राहतात रामदास
स्वामी आणि शुभ मंगल सावधान हा शब्द ऐकून ते बोहल्यावरून पळून गेले तो प्रसंग.
कारण त्या क्षणापासून ते जे सावध झाले ते आयुष्यभर आणि अखंड सावधान हाच संदेश
त्यांनी सर्वाना दिला. मला वाटते तत्वमसी हे जसे महावाक्य आहे, त्याप्रमाणे
अखंड सावधान हे व्यवहारात यशस्वी होण्यासाठीचे महावाक्य आहे. रामदासस्वामींच सगळं लिखाण हे इतक रोखठोक,
जीवनोपयोगी आणि
कालातीत आहे की तीनशे वर्षांपूर्वी लिहिलेले असूनही आजही आपल्या जगण्याला तितकंच चपखल
लागू पडत. रामदासस्वामींना क्रांतिकारी संत म्हणतात कारण त्यांनी जसे
तत्वचिंतन शिकवले तसेच लोकशिक्षणहि दिले. मरगळलेल्या समाजाच्या मनात आंतरिक
क्रांती घडवून आणली. त्यांनी अख्खा समाज घडवला आणि शिवाजीराजासारखा जाणता राजा
महाराष्ट्राला दिला. अखंड सावधपण हा संदेश जितका साधकाला लागू पडतो किंबहुना
त्यापेक्षा जास्त व्यवहारात सामान्य माणसाला लागू पडतो. हे लिहिण्याचा उद्देश
कोणाला माहित नाही म्हणून नाही तर आपल्याला चांगल्या गोष्टीचा लवकर विसर पडतो त्याची
परत आठवण करून देण्याकरता आहे.
अखंड सावधान म्हणजे नक्की काय? सावधान म्हणजे अवधानासहित म्हणजेच तुम्ही जिथे असाल तिथे शंभर टक्के कायावाचामनाने असणे आणि नुसते असणे नव्हे तर सतर्क असणे तेही अखंड.
१. आपल्या प्रत्येक
कामामध्ये मनाचा सहभाग
२.
संपूर्ण सतर्कता किंवा सजगता
३.
आपल्या सभोवती घडणाऱ्या घटना, प्रसंग आणि माणसे
ह्याकडे संपूर्ण लक्ष
जेंव्हा आपण एखाद्या गोष्टीत सतर्क असतो तेंव्हा आपली
सदसदविवेकबुद्धी जागृत असते त्यामुळे सर्व शक्यतांचा विचार करून योग्य निर्णय
घेतला जातो. बुद्धी कुठलीही चुकीची, धोकादायक गोष्ट करण्यापासून आपल्याला सावध
करते. आजकालच्या खाण्या-पिण्यामुळे, हवेमुळे आणि जीवनशैलीमुळे आपल्या जीवाला कितीतरी धोका आहे. आपण ज्या
समाजात रहातो तिथे फक्त आपल्यामुळे नाही तर दुसर्यांमुळे धोका उद्भवू शकतो. जसे
वाहन मी व्यवस्थित चालवत असले तरी मागून आणि पुढून येणार्याच्या चुकीमुळे accident
होऊ शकतो. नुसताच
शरीराला असणारा धोका नव्हे तर आपण आयुष्यात जे महत्वाचे निर्णय घेतो ते फसले
जाण्याची शक्यता ही खूप मोठी असते, आपण ज्यांच्यावर विश्वास टाकतो ती
माणसं फसवू शकतात. एकूण काय सगळीकडे धोका, जोखीम आहे म्हणून आपण हातावर हात ठेऊन बसू तर शकत नाही. ह्या सर्व
गोष्टींचा विचार करून अखंड सावधान राहिल्यास आपण उत्तम रीतीने आयुष्याचा आनंद घेऊ
शकू.
नुकतीच पेपर मध्ये आलेली बातमी वाचली
पूर्ण भरलेली बस रात्री चालली होती. सर्व प्रवासी
झोपले होते. ड्रायव्हरचाही डोळा लागला. पण एक प्रवासी ( पूज्य भिडे गुरुजी) जागे
होते. त्यांच्या सतर्क असल्यामुळे अपघात होता होता वाचला आणि सर्व प्रवाशांचे
प्राण वाचले.
अखंड सावधान ह्याचा अर्थ प्रत्येक गोष्टीकडे संशयाने
बघायचे आणि सारखा विकल्प मनात आणायचा असे नाही किंवा एकदम गबाळ्यासारखे कशातच लक्ष
घालायचे नाही असे नाही. कुठेतरी ह्या सगळ्याचा सुवर्णमध्य गाठता आला पाहिजे. आयुष्यात कधी सावधान राहायचं आणि कधी
रिलॅक्स रहायचं याच व्यवधान ठेवता आले पाहिजे. ते आपल्याला आई-वडिलांच्या किंवा
शिक्षकांच्या शिकवणुकीतून, स्वअनुभवातून तर कधीकधी दुसऱ्यांच्या अनुभवातून मिळते. पण
जितकी सावधानता जास्त तितका धोका कमी.
आपल्या
आहाराच्या, व्यायामाच्याबद्दल आपण जागरूक-सतर्क नसू तर तब्बेतीला धोका आहे. आज मी
आई म्हणून माझ्या तब्बेत्तीबद्दल आणि माझ्या कुटुंबाच्या तब्बेतीबद्दल, माझ्या
मुलांच्या जडणघडणीबद्दल, त्यांच्या प्रगतीबद्दल सतर्क असलेच पाहिजे. विद्यार्थ्यांनी
अभ्यासात सतर्क राहिले नाही तर परीक्षेच्या निकालात दिसून येईल. व्यापारी सतर्क
नसेल तर धंदा बुडेल. डॉक्टरला सतर्क राहण्यावाचून पर्याय नाही. अखंड सावधान हा तर
त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र आहे. सैनिक सतर्क नसेल तर मृत्यू येईल, आज विंग कम्माडर
अभिनंदन वर्थमान परत आले ते देशाचे नेतृत्व किंवा international pressure मुळे आले हे जितके सत्य आहे
तितकेच त्यांनी दाखवलेले धैर्य आणि सतर्कता आणि त्याप्रमाणे घेतलेल्या
निर्णयामुळेच.
आज मी
ह्या देशाची जबाबदार नागरिक म्हणून, आई-वडील म्हणून, विद्यार्थी म्हणून,
व्यावसायिक म्हणून, शेजारी म्हणून किंवा नोकरीमधे अखंड सावधान रहाणे हेच यशस्वी
जीवनाचे गमक आहे. जगण्यात
आज पावलो पावली धोका आहे. आजच्या
सोशल मिडीयाच्या युगात आपल्यावर तेही हल्ले होत आहेत, उलटसुलट बातम्या सारख्या
आपल्यावर bombard होत आहेत, अशावेळी आपण सावधपणे त्याकडे पहिले पाहिजे.
समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे हरी कथा निरुपण, राजकारण, सावधपण आणि साक्षेप अशा चतुःसूत्रीचा अवलंब केल्यास
प्रत्येकास यशस्वी होता येईल. मनाची सतर्कता, सावधपणा, alertness हे निर्धोकजीवन जगण्यासाठी फार आवश्यक
आहे मग ते आपल्यासारख्या सामान्य माणसाचे जगणे असो किंवा सीमेवर सुरक्षा करणाऱ्या
जवानांचे जीवन असो किंवा राष्ट्राची धुरा संभाळणाऱ्या नेत्याचे जीवन असो. अखंड ते सावधपण हा सहज स्वभाव
झाला पाहिजे आणि जीवनशैली झाली पाहिजे.
-- सौ. मंजिरी विवेक सबनीस
No comments:
Post a Comment