नमस्कार मंडळी,
काल मामाला पत्र लिहियाचा योग आला ( योगच म्हणावा लागेल कारण कित्येक वर्षांनी पत्र लिहिले) आणि सांगलीच्या सगळ्या आठवणी परत जाग्या झाल्या. सगळ्या मी ओंकार ला सांगितल्या, मला वाटले तो म्हणेल, "मग काय" पण त्याला सगळे ऐकून खूप मजा वाटली व मला ऐकून खूप आनंद झाला कारण तो म्हणाला की आई मी त्यावेळी जन्मायला हवे होते. :)
आम्ही दर मे महिन्यात आजोळी- सांगलीला जायचो. मला आठवतेय देऊळ, घर, बाग व कौलारू घर व प्रेमळ आजीआजोबा . आजोबांची माझी एक च आठवण आहे ती म्हणजे आरतीला त्यांच्या मागोमाग पळत पळत जायचे, इतकी गर्दी असायची पण आरती झाल्यावर देवाला पहायची घाई, मग आजोबांच्या खांद्यावर चढून बाप्पाकडे पहायची व खडीसाखरेचा प्रसाद खायची.
मे महिन्यामध्ये तर चंगळ असायची, सगळी भावंडे यायची , मग एकत्र जेवण, गप्पा, दंगा , बागेत जायचे, नदीवर जायचे, एकत्र अमरस करायचा मोठ्यांनी व लहानांनी कोई व साली खाण्यासाठी भांडायचे ( आजकाल मुलांना आमरस खावा म्हणून मागे लागावे लागते) रात्री बाहेर बाजल्यावर झोपून चांदण्या पहायच्या , ते लिंबोणीचे झाड व त्यावर बसलेल्या कोकिळा, त्यांना ओरडून- ओरडून चिडवायचे व मग त्या चिडल्या की हसत बसायचे. खास कार्यक्रमाला लांब जावे लागायचे तिकडे जाताना गप्पा, त्यातून रात्री लागली तर ४ जणानी जायचे सोबतीला. आजीच्या हातचे छान जेवण , साखरांबा, गुळांबा , लोणचे व सुपारी. मला एक आठवण आवर्जून सांगायची आहे जी माझ्या मनात कायमची कोरली गेलीय.
मी, स्वप्ना , जोत्स्ना व सीमा आम्ही पाठोपाठच्या मावसबहिणी. मी ४-५ वी मध्ये असेन. आम्ही सगळे खेळत होतो, तेवढयात खूप माकडे (हुपले ) आली व हैदोस घालायला लागली. आम्ही सगळ्या खूप घाबरलो व सगळी दार व खिडक्या बंद करून बसलो. त्यांचा दंग अजून वाढला. कोणाला सांगायचे तरी दार उघडून बाहेर जावे लागणार होते मग कोण जाणार?
तर ……।
आजीने काय करावे?
आजीच्या दोन्ही पायांना दुखापत झाल्याने ती कुबड्या घेऊन चालायची. तिने रामाचा फोटो घेतला व कुबड्या घेऊन, एका हातात फोटो घेऊन एकटीच बाहेर गेली. आम्ही चौघी आ वासून काय चाललेय ते पाहत होतो . बाहेर जाऊन तिने त्या माकडांना रामाचा फोटो दाखवला व त्यांना खूप सुनावले, तुम्हाला रामाची शप्पथ वगैरे
आणी काय आश्चर्य ……. ती माकडे निघून गेली .
आजीची अशी अवस्था असताना तिने जायचे केलेले धाडस, तिचा रामावरचा विश्वास व अश्या प्रसंगी असे काहीतरी सुचावे हे मला तेव्हाही अचंबित करायचे व आजही.
ओंकार म्हणाला my Panaji was such a brave lady आणि आम्ही खूप हसलो .
No comments:
Post a Comment