Thursday, 30 November 2017

आमचा लक्कू – भाग ३


'आमचा लक्कु' या लेख मालिकेचे दोन भाग वाचून मला खूप मेसेज आले. सगळ्यांनी भरभरून लिहिले आणि प्रत्येकाला आपल्या डॉगची आठवण झाली. खरच डॉगज असतातच भयंकर प्रेमळ. देवानी त्यांना फक्त एकच गोष्ट शिकवली ती म्हणजे आपल्या माणसांवर भरभरून प्रेम करायचे.

जगात दोन प्रकारची माणसे असतात –
  १.      ज्यांना भूभू आजिबात आवडत नाही -  माझे लेख बघून ते म्हणत असतील – अरे यार कधी संपणार हिचे. त्यांच्याकरता खबर- ह्या लेखाचा हा शेवटचा भाग आहे. J
  २.      ज्यांना भूभू खूप आवडतो – ते मात्र अजून लिही म्हणून आपल्या आठवणी सांगत बसतील.
काहीजण मात्र माझ्यासारखे असतील १ मधून २ मधे कनव्हर्ट झालेले. 
मी आधी म्हटल्याप्रमाणे सगळ्या डॉगचा स्वभाव वेगवेगळा, सवयी वेगळ्या, आवडी वेगळ्या. त्यामुळे मी जे लिहिलेय ते लक्कूपुरते आहे. प्रत्येक डॉगला खायला आवडतेच असे नाही किंवा माया केलेली आवडते असे नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आणि आवडीनुसार डॉगला खायला काय द्यायचे आणि किती द्यायचे ते ओनरनीच ठरवायचे. labrador मात्र जनरली ह्या प्रकारात मोडतो. लक्कुला सुद्धा मी वरती लिहिलेल्या गोष्टी रोज देतो, भरपूर देतो असे नाही. त्याचेसुद्धा strict routine आहे. कधी कधी मात्र, आम्ही स्पेशल केलेले जेवण प्रमाणात देतो. ते सुद्धा सगळे एका दिवशी नाही. साधारणपणे लहान मुलांना जसे पोळीभाजी नको आणि जंक हवे असते तसेच भूभूचे. प्रत्येक आईनी ठरवायचे द्यायचे का नाही. डॉगना कांदा, चॉकलेट आणि द्राक्ष त्याला मात्र अजिबात चालत नाहीत.

अजून एक मजा मागच्या वेळी सांगायची राहिली. त्याला मी सायीचे ताक केल्यावर देते. ते त्याला खूप आवडते. ते पिऊन झाल्यावर तो एक गोष्ट नेहमी करतो ती म्हणजे सगळे अंग चाटतो. आपण क्रीम लावतो तसे सगळ्या अंगाला तो चाटून मऊ करतो. J J

मी आधीच्या भागात सांगितले होते आम्ही त्याला फळे खायला देतो. केळ, सफरचंद, मोसंबी, पपई, पेरू हे सगळे १-२ फोडी आम्ही जेंव्हा खातो, तेंव्हा देतो. लक्कू जांभूळ आणि बोर मस्त वरचे खाऊन बिया टाकतो. एकदा आम्ही त्याची परीक्षा घेतली. त्याला रामबुतान आणि लीची दिले तर आमचीच टोपी पडली. पठ्ठ्याने वरचे साल आणि आतल्या बिया टाकून मधला भाग मस्त खाल्ला. J खरेच प्रत्येक जीवाला मन, भावना आणि बुद्धी त्याच्या कामापुरती दिलेली आहे. जसे आपण त्यांच्याबरोबर राहू तसे आपल्याला कळत जाते. काही न बोलतासुद्धा हे प्राणी डोळ्यांनी खूप बोलतात आणि सरावाने आपल्याला ते सर्व कळते. लक्कू आवाज वेगवेगळे काढतो म्हणजे लाडात असेल तर वेगळा, बाहेरचे डॉग असतील तर वेगळा, मांजर दिसली कि अगदी ठेवणीतला असतो, अनोळखी आणि संशयित असेल तर वेगळा, घरी कोणी नवीन आले आणि त्यांनी भाव दिला नाही किंवा इग्नोअर केले की वेगळा, कधी उगीचच समोरच्याला घाबरवायला असे आपल्यालाही फरक कळत जातो. ओरडल्यावर समोरचा घाबरला तर हसतही असतील डॉग कशी मज्जा केली म्हणून. J

थंडीसाठी झोपायला त्याला एक बेडशीट दिले आहे. त्याला त्याची इतकी ओनरशिप वाटते. मी कपड्याच्या घड्या करायला घेतल्या की लगेच त्याचे बेडशीट घेऊन येतो. घरभर सगळीकडे ते घेऊन फिरत असतो. त्याच्या आपल्या २-३ गोष्टी आहेत. सगळ्या चावून फाडलेल्या आहेत पण छोट्या जीवाला त्या आपल्या वाटतात ह्याचीच मला मजा वाटते. सगळ्या घरभर त्याचा विहार असतो. सोफ्यावर आणि बेडवर मात्र आजिबात यायचे नाही अशी शिस्त मी लावली आहे. माझे सासरे आणि वडील यांना डॉगी फार आवडत नाही त्यामुळे त्यांच्या खोलीत जायचे नाही हे त्याला माहित आहे पण कधी कधी सगळ्यांचा डोळा चुकवून महाराज आत जाऊन बरोबर त्यांच्याच गोष्टी पळवून आणतात. पकडायला गेले की घरभर आमची वरात असते...तो पुढे आणि बाकी सगळे मागे. J J
अशीच मज्जा 
आजकाल आम्ही चांगले कपडे घातले की त्याला कळते की आम्ही बाहेर चाललोय. मग त्याची एक एक नाटकं चालू होतात. इतके वाकडे तोंड करून आपल्याकडे पाहत बसतो की घराच्या कुणालातरी दया यावी. मग मोठे मोठे उसासे सोडून अंग टाकतो (लिटरली) किती माझ्यावर अन्याय होतोय असे डोळे पाडून बसतो. त्याच्या अंगावरून हात फिरवला तर पाहत नाही, उठून जातो. J आपल्याला काही तास कामासाठी बाहेर जायचे असते तेंव्हा आम्ही त्याला सांगून जातो. त्याला खायला-प्यायला ठेऊन जातो. पण तो कशालाही तोंड लावत नाही. इतर वेळी हावरटपणा करणारा हाच का तो ह्याची शंका यावी. दारात वाट पाहत बसून राहतो. आपण घरात पाऊल टाकले की मात्र एकदा गळा भेटून, आपला आनंद व्यक्त करून, किती मिस केले हे सांगून खायला पळून जातो.
मी कधी कधी सिरीयस असतो बर का !
बाहेरगावी जायचे म्हणजे आपलीच परीक्षा असते. आम्ही त्याला जवळ राहणाऱ्या एका कुटुंबाकडे सोडतो. बाहेर जायचे म्हटले की स्वारी खुश. एकदम उड्या मारून फूल excited mode. जसे जसे त्यांचे घर जवळ येते तसे पुढे काय वाढून ठेवलेय याची कल्पना येते. मग खाली मान घालून त्यांच्या घरी जिथे त्याला ठेवतात तिथे जाऊन बसतो. आपल्याकडे पहातही नाही. जेंव्हा आणायला जातो तेंव्हा इतका वेळ आपल्यावर ओरडत असतो. काही एकूण घेत नाही. १० मिनिटे त्याचे असे चाललेले असते. का सोडून गेलीस? मला इतकी आठवण झाली असे काहीतरी म्हणत असावा. घरी आल्यावर सगळ्यांच्या रुममध्ये जाऊन एकदा सगळ्यांना भेटले की महाराज खुश.

मला नुकताच घडलेला प्रसंग सांगायचा आहे. खरेतर आपण असे बरेचदा ऐकत असतो पण प्रसंग जवळपासच्या लोकांकडे झाला की आपल्यावर त्याचा परिणाम होतो. पेट घरी आणून ठेवण्याची क्रेझ ( हो क्रेझच म्हणावे लागेल) ही अगदी अलीकडची. त्याची कारणे बरीच आहेत. त्यावर एक स्वतंत्र लेख होईल. पूर्वी बरेच जणांच्या कडे डॉग होते पण घराबाहेर असायचे. बरेचदा बंगल्याच्या संरक्षणासाठी डॉग असायचा. पण गेल्या काही वर्षात डॉग पेटचे प्रमाण खूप वाढले. कारण बरेचदा मुलांना हवाय म्हणून किंवा आपलाच लहानपणाचा हट्ट अपुरा राहिला म्हणून.

तर असाच आमच्या कॉम्प्लेक्समध्ये एकांनी डॉग आणला. दोघे नोकरी करत असल्याने त्याची पूर्ण जबाबदारी मेडकडे होती. आम्ही बरेच जणांकडून ऐकले की दिवसभर एकटा असतो. बाकी वेळा पण त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आमच्या अपार्टमेंटमध्ये डॉगसाठी खूपच रूल आहेत. बरेचदा मेड तिला वेळ असेल तेंव्हा त्याला शी-शु साठी बाहेर घेऊन जायची. बरेचदा तो कुठेही वाटेत कार्यक्रम करायचा. त्याच्या इतक्या कम्प्लेंट यायच्या. मालक नेहमीच हात वर करायचे. त्यांचेही स्वतःचे बरेच प्रश्न असतील पण त्यांनी एक दिवशी ब्रीडरला बोलावून डॉगला देऊन टाकले. आम्हाला सगळ्यानांच खूप वाईट वाटले.

हे सर्व लिहिण्यामागे मला कुणालाही डॉग घेण्यासाठी discourage करायचे नाही पण जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी हा खटाटोप. डॉग छोटा असो की मोठा ते काही खेळणे नव्हे. मनात आणले घरी आणले, आवडले नाही तर टाकून दिले. कुठलाही पेट घरी आणणे ही पूर्ण कुटुंबाची मोठी जबाबदारी आहे. अगदी बाळ दत्तक घेण्यासारखी. जशी बाळाची मोठे होईपर्यंत किंबहुना कायमचीच जबाबदारी असते तशीच पेटची. त्याच्याही खाण्याकडे लक्ष द्यावे लागते. त्याचीही आजारपण, दुखणीखुपणी असतात. त्यालाही खाण्याची- झोपण्याची- पोट्टी सवय लावावी लागते. हे प्राणी इतके छान असतात, एकदा का शिस्त लावली कि ते इतकी छान पाळतात. त्याच्या सर्व वेळा मात्र आपल्याला सांभाळाव्या लागतात. बाहेरगावी सोडून जायचे असेल तर तो विचार करावा लागतो. बेसिकली घरातला एक सदस्य म्हणून त्याचा विचार करावा लागतो. घरचे सगळे जण जर हातभार लावणार असतील तर पेट जरूर घरी आणावा. त्यासारखा आनंद नाही. तुम्ही त्याला द्याल त्याच्या शतपटीने प्रेम तुम्हाला मिळेल अगदी १००%. मी हीसुद्धा ग्यारेंटी देते की डॉग आणायचा निर्णयावर तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही.

तुम्ही सर्वांनी ह्या लक्कू सिरीजला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
That’s all for now from me. J

Lots of love from Lakku. 💓💓💓

No comments:

Post a Comment