Thursday, 30 November 2017

आमचा लक्कू – भाग ३


'आमचा लक्कु' या लेख मालिकेचे दोन भाग वाचून मला खूप मेसेज आले. सगळ्यांनी भरभरून लिहिले आणि प्रत्येकाला आपल्या डॉगची आठवण झाली. खरच डॉगज असतातच भयंकर प्रेमळ. देवानी त्यांना फक्त एकच गोष्ट शिकवली ती म्हणजे आपल्या माणसांवर भरभरून प्रेम करायचे.

जगात दोन प्रकारची माणसे असतात –
  १.      ज्यांना भूभू आजिबात आवडत नाही -  माझे लेख बघून ते म्हणत असतील – अरे यार कधी संपणार हिचे. त्यांच्याकरता खबर- ह्या लेखाचा हा शेवटचा भाग आहे. J
  २.      ज्यांना भूभू खूप आवडतो – ते मात्र अजून लिही म्हणून आपल्या आठवणी सांगत बसतील.
काहीजण मात्र माझ्यासारखे असतील १ मधून २ मधे कनव्हर्ट झालेले. 
मी आधी म्हटल्याप्रमाणे सगळ्या डॉगचा स्वभाव वेगवेगळा, सवयी वेगळ्या, आवडी वेगळ्या. त्यामुळे मी जे लिहिलेय ते लक्कूपुरते आहे. प्रत्येक डॉगला खायला आवडतेच असे नाही किंवा माया केलेली आवडते असे नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आणि आवडीनुसार डॉगला खायला काय द्यायचे आणि किती द्यायचे ते ओनरनीच ठरवायचे. labrador मात्र जनरली ह्या प्रकारात मोडतो. लक्कुला सुद्धा मी वरती लिहिलेल्या गोष्टी रोज देतो, भरपूर देतो असे नाही. त्याचेसुद्धा strict routine आहे. कधी कधी मात्र, आम्ही स्पेशल केलेले जेवण प्रमाणात देतो. ते सुद्धा सगळे एका दिवशी नाही. साधारणपणे लहान मुलांना जसे पोळीभाजी नको आणि जंक हवे असते तसेच भूभूचे. प्रत्येक आईनी ठरवायचे द्यायचे का नाही. डॉगना कांदा, चॉकलेट आणि द्राक्ष त्याला मात्र अजिबात चालत नाहीत.

अजून एक मजा मागच्या वेळी सांगायची राहिली. त्याला मी सायीचे ताक केल्यावर देते. ते त्याला खूप आवडते. ते पिऊन झाल्यावर तो एक गोष्ट नेहमी करतो ती म्हणजे सगळे अंग चाटतो. आपण क्रीम लावतो तसे सगळ्या अंगाला तो चाटून मऊ करतो. J J

मी आधीच्या भागात सांगितले होते आम्ही त्याला फळे खायला देतो. केळ, सफरचंद, मोसंबी, पपई, पेरू हे सगळे १-२ फोडी आम्ही जेंव्हा खातो, तेंव्हा देतो. लक्कू जांभूळ आणि बोर मस्त वरचे खाऊन बिया टाकतो. एकदा आम्ही त्याची परीक्षा घेतली. त्याला रामबुतान आणि लीची दिले तर आमचीच टोपी पडली. पठ्ठ्याने वरचे साल आणि आतल्या बिया टाकून मधला भाग मस्त खाल्ला. J खरेच प्रत्येक जीवाला मन, भावना आणि बुद्धी त्याच्या कामापुरती दिलेली आहे. जसे आपण त्यांच्याबरोबर राहू तसे आपल्याला कळत जाते. काही न बोलतासुद्धा हे प्राणी डोळ्यांनी खूप बोलतात आणि सरावाने आपल्याला ते सर्व कळते. लक्कू आवाज वेगवेगळे काढतो म्हणजे लाडात असेल तर वेगळा, बाहेरचे डॉग असतील तर वेगळा, मांजर दिसली कि अगदी ठेवणीतला असतो, अनोळखी आणि संशयित असेल तर वेगळा, घरी कोणी नवीन आले आणि त्यांनी भाव दिला नाही किंवा इग्नोअर केले की वेगळा, कधी उगीचच समोरच्याला घाबरवायला असे आपल्यालाही फरक कळत जातो. ओरडल्यावर समोरचा घाबरला तर हसतही असतील डॉग कशी मज्जा केली म्हणून. J

थंडीसाठी झोपायला त्याला एक बेडशीट दिले आहे. त्याला त्याची इतकी ओनरशिप वाटते. मी कपड्याच्या घड्या करायला घेतल्या की लगेच त्याचे बेडशीट घेऊन येतो. घरभर सगळीकडे ते घेऊन फिरत असतो. त्याच्या आपल्या २-३ गोष्टी आहेत. सगळ्या चावून फाडलेल्या आहेत पण छोट्या जीवाला त्या आपल्या वाटतात ह्याचीच मला मजा वाटते. सगळ्या घरभर त्याचा विहार असतो. सोफ्यावर आणि बेडवर मात्र आजिबात यायचे नाही अशी शिस्त मी लावली आहे. माझे सासरे आणि वडील यांना डॉगी फार आवडत नाही त्यामुळे त्यांच्या खोलीत जायचे नाही हे त्याला माहित आहे पण कधी कधी सगळ्यांचा डोळा चुकवून महाराज आत जाऊन बरोबर त्यांच्याच गोष्टी पळवून आणतात. पकडायला गेले की घरभर आमची वरात असते...तो पुढे आणि बाकी सगळे मागे. J J
अशीच मज्जा 
आजकाल आम्ही चांगले कपडे घातले की त्याला कळते की आम्ही बाहेर चाललोय. मग त्याची एक एक नाटकं चालू होतात. इतके वाकडे तोंड करून आपल्याकडे पाहत बसतो की घराच्या कुणालातरी दया यावी. मग मोठे मोठे उसासे सोडून अंग टाकतो (लिटरली) किती माझ्यावर अन्याय होतोय असे डोळे पाडून बसतो. त्याच्या अंगावरून हात फिरवला तर पाहत नाही, उठून जातो. J आपल्याला काही तास कामासाठी बाहेर जायचे असते तेंव्हा आम्ही त्याला सांगून जातो. त्याला खायला-प्यायला ठेऊन जातो. पण तो कशालाही तोंड लावत नाही. इतर वेळी हावरटपणा करणारा हाच का तो ह्याची शंका यावी. दारात वाट पाहत बसून राहतो. आपण घरात पाऊल टाकले की मात्र एकदा गळा भेटून, आपला आनंद व्यक्त करून, किती मिस केले हे सांगून खायला पळून जातो.
मी कधी कधी सिरीयस असतो बर का !
बाहेरगावी जायचे म्हणजे आपलीच परीक्षा असते. आम्ही त्याला जवळ राहणाऱ्या एका कुटुंबाकडे सोडतो. बाहेर जायचे म्हटले की स्वारी खुश. एकदम उड्या मारून फूल excited mode. जसे जसे त्यांचे घर जवळ येते तसे पुढे काय वाढून ठेवलेय याची कल्पना येते. मग खाली मान घालून त्यांच्या घरी जिथे त्याला ठेवतात तिथे जाऊन बसतो. आपल्याकडे पहातही नाही. जेंव्हा आणायला जातो तेंव्हा इतका वेळ आपल्यावर ओरडत असतो. काही एकूण घेत नाही. १० मिनिटे त्याचे असे चाललेले असते. का सोडून गेलीस? मला इतकी आठवण झाली असे काहीतरी म्हणत असावा. घरी आल्यावर सगळ्यांच्या रुममध्ये जाऊन एकदा सगळ्यांना भेटले की महाराज खुश.

मला नुकताच घडलेला प्रसंग सांगायचा आहे. खरेतर आपण असे बरेचदा ऐकत असतो पण प्रसंग जवळपासच्या लोकांकडे झाला की आपल्यावर त्याचा परिणाम होतो. पेट घरी आणून ठेवण्याची क्रेझ ( हो क्रेझच म्हणावे लागेल) ही अगदी अलीकडची. त्याची कारणे बरीच आहेत. त्यावर एक स्वतंत्र लेख होईल. पूर्वी बरेच जणांच्या कडे डॉग होते पण घराबाहेर असायचे. बरेचदा बंगल्याच्या संरक्षणासाठी डॉग असायचा. पण गेल्या काही वर्षात डॉग पेटचे प्रमाण खूप वाढले. कारण बरेचदा मुलांना हवाय म्हणून किंवा आपलाच लहानपणाचा हट्ट अपुरा राहिला म्हणून.

तर असाच आमच्या कॉम्प्लेक्समध्ये एकांनी डॉग आणला. दोघे नोकरी करत असल्याने त्याची पूर्ण जबाबदारी मेडकडे होती. आम्ही बरेच जणांकडून ऐकले की दिवसभर एकटा असतो. बाकी वेळा पण त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आमच्या अपार्टमेंटमध्ये डॉगसाठी खूपच रूल आहेत. बरेचदा मेड तिला वेळ असेल तेंव्हा त्याला शी-शु साठी बाहेर घेऊन जायची. बरेचदा तो कुठेही वाटेत कार्यक्रम करायचा. त्याच्या इतक्या कम्प्लेंट यायच्या. मालक नेहमीच हात वर करायचे. त्यांचेही स्वतःचे बरेच प्रश्न असतील पण त्यांनी एक दिवशी ब्रीडरला बोलावून डॉगला देऊन टाकले. आम्हाला सगळ्यानांच खूप वाईट वाटले.

हे सर्व लिहिण्यामागे मला कुणालाही डॉग घेण्यासाठी discourage करायचे नाही पण जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी हा खटाटोप. डॉग छोटा असो की मोठा ते काही खेळणे नव्हे. मनात आणले घरी आणले, आवडले नाही तर टाकून दिले. कुठलाही पेट घरी आणणे ही पूर्ण कुटुंबाची मोठी जबाबदारी आहे. अगदी बाळ दत्तक घेण्यासारखी. जशी बाळाची मोठे होईपर्यंत किंबहुना कायमचीच जबाबदारी असते तशीच पेटची. त्याच्याही खाण्याकडे लक्ष द्यावे लागते. त्याचीही आजारपण, दुखणीखुपणी असतात. त्यालाही खाण्याची- झोपण्याची- पोट्टी सवय लावावी लागते. हे प्राणी इतके छान असतात, एकदा का शिस्त लावली कि ते इतकी छान पाळतात. त्याच्या सर्व वेळा मात्र आपल्याला सांभाळाव्या लागतात. बाहेरगावी सोडून जायचे असेल तर तो विचार करावा लागतो. बेसिकली घरातला एक सदस्य म्हणून त्याचा विचार करावा लागतो. घरचे सगळे जण जर हातभार लावणार असतील तर पेट जरूर घरी आणावा. त्यासारखा आनंद नाही. तुम्ही त्याला द्याल त्याच्या शतपटीने प्रेम तुम्हाला मिळेल अगदी १००%. मी हीसुद्धा ग्यारेंटी देते की डॉग आणायचा निर्णयावर तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही.

तुम्ही सर्वांनी ह्या लक्कू सिरीजला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
That’s all for now from me. J

Lots of love from Lakku. 💓💓💓

Wednesday, 29 November 2017

आमचा लक्कू – भाग २

लक्कूबद्दल लिहिलेले वाचून काही मैत्रिणींचा फोन आला, काय झाले मला अचानक हे विचारायला. अध्यात्मिक विषयांवर लिहितालिहिता हे काय एकदम? त्याला कारणही तसेच झाले. काहींनी हेही विचारले की तुम्हाला आवडत नसताना आणि अनुभव नसताना लक्कू घरी आला कसा?

खरतर मी ४ वर्षापूर्वी लक्कुबद्दल लिहिले होते. पण बरेच जणांना ते माहित नाही म्हणून आधी त्याबद्दल थोडे सांगते.

माझ्या मुलाने ओंकारने, तो तिसरी मध्ये असताना DOG PET पाहिजे म्हणून हट्ट धरला. पण ते शक्य नाही म्हणून मी ही २-४ वर्षे नकार देत राहिले. मी का कुत्रा? असा ultimatum ही दिला.  त्यामुळे ओंकारने FISH PET म्हणून निभावून नेले. एक चे दोन करता करता २० फिश चा tank घरी आला. पण फिशचा काहीही रिस्पोन्स नसल्यामुळे ओंकार त्यात रमला नाही व परत डॉगसाठी हट्ट चालू झाला. आठवीमध्ये असताना तर अगदी रडारडी झाली की मला डॉग पाहिजेच. आता नवऱ्याने मला सावध केले की लहानपणी मी का कुत्रा? असे ultimatum दिले होतेस, त्या फंदात आता पडू नकोस, मुलगा मोठा झालाय, त्याचे उत्तर झेपणार नाही तुला. मला परिस्थितीचे गांभीर्य कळले. डॉग आणलास तर मी त्याचे सगळे करीन व परत आयुष्यात कधीही हट्ट करणार नाही असे मला कबूल करून एक महिन्याचा लक्कू ६ फेब्रुवारी २०११ ला आमच्या घरी आला. तेरा वर्षाचे पोर डॉगसाठी येवढी मोठी मोठी वचने देतेय पाहून मलाही भरून आले आणि त्याची किती प्रबळ इच्छा आहे ह्याची जाणीव झाली.

१-२ महिने कुठले ब्रीड आणायचं ह्यावर अभ्यास झाला व सर्वानुमते labrador आणायचे ठरले. डॉग ची ही वंशावळ (घराणे) असते व विकत घेताना ह्या गोष्टीला खूप महत्व असते व त्यानुसार त्याची किंमत ठरते. असे सगळे पाहून आजोबा अमेरिकन व आजीकडचे ऑस्ट्रेलिअन असे गुड पेडिग्री असलेला लक्कू आमच्या घरी आला. (labrador विदेशी ब्रीड आहे) बरेच पपीज आम्ही पाहिले व जो active होता,  हुशार दिसत होता व शांत आणि जगन्मित्र वाटत होता असा गोडुला लक्कू आमच्या घरी आला.
                    
डॉगी घरी आणायचा म्हणून भरपूर अभ्यास करून, अनुभवी लोकांबरोबर बोलून आम्ही तिघे श्वानसेवेकरता सज्ज झालो. सर्वानुमते त्याचे नामकरण झाले. पठ्ठ्या नावाप्रमाणे LUCKY आहे याची प्रचीती यायला लागली कारण त्यांनी तोंड उघडायच्या आत ३ माणसे धावून जायला लागली. ३ parents मिळाले त्याला. आज दिवसभर लक्कूने काय केले व काय केले नाही अशा चर्चा संध्याकाळी रंगायला लागल्या. लक्कूने काय खाल्ले, शिशू कितीवेळा केली ह्याचा count ठेवला जावू लागला. लक्कू झोपला की नाही / किती वेळ? / का झोपला नाही ह्यावर चिंतासेशन होऊ लागले.

हळूहळू सगळ्यांना आमच्या घरच्या new addition ची बातमी कळली व लकीला पहायला मित्रांची गर्दी होऊ लागली. मग लकी असा व तसा अशा चर्चा व आमच्याबरोबर डॉगबद्दल सगळ्यांच्या सामान्यज्ञानात भर पडली. लक्कूही भरपूर फुटेज खाऊ लागला. सगळे पाहायला आले की शांतपणे बाथरूममध्ये जाऊन झोपायचे / सोफ्याच्या खाली जाऊन बसायचे अशा त्याच्या पपीलीला चालू झाल्या.

नव्याचे नऊ दिवस संपल्यावर मग लक्कू महाराजांनी दात शिवशिवत असल्यामुळे घरात दिसेल ती वस्तू चावायला चालू केली. सोफा / chairs / bedsheets / कपडे / चपला ह्याचे तुकडे घरभर दिसायला लागले. लक्कुचा teething problem चालू आहे असे डॉक्टरनी सांगितले. त्याचे vaccination चे time table  आले व ते  reminder phone मध्ये store झाले. Carrot and Cucumber चे तुकडे खायला द्या असे सल्ले मिळाले. लकी carrot खूप छान खायचा.

लक्कुच्या teething problem मुळे माझी झोप उडाली. जेवढा विचार मी ओंकारच्या लहानपणी केला नसेल तेवढा आता करू लागले. नंतर potty training / behaviour training अशी आमची खटपट चालू झाली व आमच्या लक्षात आले की हा मुलगा आमच्या हाताबाहेर गेलाय. हे सगळे लहानपणीच शिकवायचे असते. मग आम्ही त्याला trainer ठेवला. trainer च्या समोर सुत व बाकीच्या वेळी भूत असे त्याचे वागणे चालू झाले आणि ते आजतागायत चालू आहे. trainer जे काही सांगेल ते ऐकायचा पण आम्ही १०० वेळा सीट म्हणाल्यावर कधीतरी एकदा सिटायचा. नाइलाजाने trainer ला bye bye म्हणावे लागले. सगळ्या कामवाल्यांना सतावणे / पायाला चावणे / झाडताना केर उचाकावणे / सुपले घेऊन घरभर पळत सुटणे / dining table वरच्या वस्तू पळवणे / आम्ही बोलायला लागलो की मध्ये येऊन बसणे / सगळ्या वस्तू पाडणे / उश्या फाडणे अश्या खोड्या वाढत गेल्या. कुत्रा अपेक्षेपेक्षा जास्त active व हुशार असल्यामुळे नाकी नाऊ आणले. पण लक्कुच्या वेगवेगळ्या स्टेजेस आम्ही एन्जोय केल्या. वयाच्या दीड वर्षी तो थोडा settle झाला. (असे म्हणण्यापेक्षा आम्ही थोडे शहाणे झालो)
  
हौसेला मोल नाही ह्याचा अर्थ बेंगलोरमध्ये असलेल्या डॉगकरता सेवासुविधा पाहून कळतो. त्यांच्याकरता pet house आहेत / स्पा आहेत / पार्लर आहेत / त्यांचेही haircut / manicure / pedicure होते. त्याचेही बर्थडे पार्टी arrange होतात. return गिफ्ट्स हि मिळतात. one day आऊटिंग arrange करता येते. त्यांना emotional problems  येवू नयेत म्हणून डॉक्टर आहेत. त्यांचाही वेट लॉस प्रोग्राम असतो / जिम असते / vitamins /minerals/sugar/BP control ठेवण्याकरता रेगुलर visit कराव्या लागतात.

थोडक्यात आमच्या घरी एक २-३ वर्षे वयाच्या मुलाची बुद्धी असलेले व न बोलणारे बाळ आले. जे कधी मोठे होणार नाही. हे सगळे जरी खरी असले तरी लकी आमच्या घराचे चैतन्य आहे. कितीही दमून घरी आले की लकीच्या स्वागताने सगळा शीण निघून जातो. सगळ्या घराला सारखे on the toes ठेवणारे, फक्त प्रेम व प्रेमच करणारे व काहीही आमच्याकडून अपेक्षा न ठेवणारे असे खोडकर बाळ. आता आम्हालाही त्याच्या मनातले त्याच्या डोळ्यातून कळायला लागलेय.

श्वानायान पुढे चालू …….

आमचा लक्कू – भाग १

आतापर्यंत कुत्रे चावल्यावर १४ injections घ्यावी लागतात ह्या मौलिक माहितीपेक्षा कुत्र्याबद्दल काहीही माहिती नसणारी मी कुत्र्यावर लेख लिहीन असे स्वप्नातही वाटले नव्हते. माझ्या माहेरच्या व सासरच्या ७ पिढ्यात कुणीही कुत्रे पाळले नव्हते व तसे करायची माझी व माझा नवरा यांची इच्छाही नव्हती. पण म्हणतात ना कधी / कसे / काय घडेल हे सर्व त्याच्या हातात असते आणि झालेही तसेच.......

आठवतेय गेल्या चार वर्षांपूर्वी मी आमच्या लक्कूबद्दल लिहिले होते. आता आम्ही अजून Dog trained झालोय, म्हणून लक्कुच्या अजून गमती-जमती शेअर करायचा विचार केला. जसे लग्नाळू लोक असतात तसे डॉगाळू जे लोक आहेत त्यांना तेवढीच माहिती. Practical Experience share करतीय.

लक्कू आमच्या घरी येवून आता आठ वर्षे झाली. खरतर लक्कुला हल्ली कुत्रा म्हणायला सुद्धा कसेतरी वाटते कारण आता तो आमच्या घरचा मेंबर झालाय. तो कुत्रा कमी आणि माणसासारखा वागायला लागलाय. हो आश्चर्य वाटले ना? तो काय काय खातो आणि कसा वागतो हे ऐकल्यावर तुम्हाला नक्की पटेल.

इतक्या वर्षाचे माझे एक निरीक्षण आहे की जसा डॉग ओनर असतो त्याचे सगळे गुणधर्म डॉगमधेही येतात. अगदी खर... म्हणजे जश्या ओनर च्या सवयी आणि स्वभाव तसाच त्यांच्या कुत्र्याचा असतो. म्हणजे डॉग ओनर जर तुसडा असेल तर डॉगही उगीच सगळ्यांवर भुंकत असतो. त्याचे दुसऱ्या डॉग बरोबर पटत नाही. डॉग ओनर जर गर्विष्ठ असेल तर डॉगही कुणाकडेही ढुंकूनसुद्धा पाहत नाही. डॉग ओनर जर प्रेमळ आणि जगमित्र असेल तर डॉगही तसाच असतो. जसे माणसांचे विविध प्रकार असतात अगदी तसेच डॉगचेही असतात. आनंदी, चिडके, भित्रे, रागीट, तुसडे, हसरे, मायाळू अगदी इमोशनल सुद्धा. लक्कुचे सगळ्यां डॉगशी पटते, त्याला डॉग पेक्षा माणसे भयंकर आवडतात.

त्याला सगळ्या प्रकारचे खाणे खायला आवडते. आम्ही वेजीटेरीयन त्यामुळे लक्कुही. मी बऱ्याच डॉगच्या खाण्याच्या बाबतीतल्या आवडी-नावाडी ऐकल्या आहेत पण आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही. खाण्यासाठी जन्म आपुला ह्या कॅटेगरीमध्ये तो मोडतो. त्याला सगळे बेकरी product भयंकर आवडतात. त्याला साय भयंकर आवडते, हापूस आंबा, ताक, दही, इडली, डोसे, भात, नूडल्स, थालीपीठ, लाडू, चकली, फरसाण, ढोकळा, शेंगदाणे, पॉपकोर्न, मोदक, पुरणपोळी हेही भयंकर आवडते. त्याला बेसिकली सगळेच भयंकर आवडते. तो गाजर, काकडी, कोबी, बटाटा, बिन्स, टोमाटो, बीट, मुळा, फ्लॉवर इत्यादी भाज्या आणि त्याची सालेही आवडीने खातो. तोही खात असल्यामुळे आम्ही सगळे देतो. मी किचेन मध्ये गेल्यावर साय खरवडून काढण्याचा किंवा कापण्याचा किंवा साले काढण्याचा आवाज आला की लक्कू हजर. जर मी कांदा कापत असेन किंवा भोंगी मिरची, पडवळ, दुधीभोपळा, भेंडी अशा अरसिक भाज्या कापत असेन तर तो एक सेकंदही थांबत नाही. आपल्या मतलबाचे नसेल तर तिथे थांबायचे नाही अशी बुद्धी त्या छोट्याश्या मेंदूत आहे हे पाहून थक्क व्हायला होते. पण जर मतलबाचे असेल तर तिथून हलायचे नाही, सारखे आशाळभूतपणे बघत बसायचे, शेवटी तुम्हालाच गिल्टी वाटले पाहिजे आपण देत नाही म्हणून. असा काही चेहरा करतात हे डांबिस प्राणी की तुमचीच परीक्षा असते. ते डोळ्यात भाव आणून पाहणे, ते शेपटी हलवणे, ते लाडात येणे, ते भोवती फिरणे.....Noone can beat dogs……you learn persistence from them.

एकदा डॉक्टर कडे गेलो असता त्याने सांगितले की लक्कू ओबीज आहे, ( तसा ओबीसीटी आमचा फमिली प्रोब्लेम आहे ) असो. त्याचे वजन कमी करायला पाहिजे, त्याच्यासाठी डाएटिंग आणि व्यायाम आणि लाईफ स्टाईल चेंजची आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले. झाले आमचे मिशन स्लिम लक्कू चालू झाले. त्याला पाळायला नेणे, उड्या मारायला लावणे, वायफळ खायला न देणे, फक्त २ वेळेला डॉक्टरनी सांगितलेले स्पेशल फूड मोजून देणे असे करायचा थोडे दिवस प्रयत्न केला. त्याच्या डोळ्यांकडे न पाहता कठोर होण्याचा प्रयत्न केला पण नवीन वर्षाचा जसा संकल्प असतो तसाच आमचा हा प्रयत्न थोडा काळ टिकला. डाएटिंग फूड मुळे त्याची काही भूक भागेना, आरडओरडा करायचा. शेवटी त्यांनी मोजून खायचे आम्ही मोजून द्यायचे बंद केले. आमच्याकडे सगळ्यांना इतकी माया येते...खाऊदे ग बिचारा.....कसे डोळे करून पाहतोय बघ..... किती हा तुझा दुष्टपणा.....त्याला कसले डाएटिंग करायला लावते असे सगळ्यांनी मलाच इमोशनल blackmail केल्यामुळे नव्याचे नऊ दिवस लगेच संपले. लक्कुच्या वेटबद्दल आता डिस्कस करायचे नाही असे ठरले. चालतंय की जाड असला तर....काssssही बिघडत नाही.


बाकीचे पुढच्या भागात JJJ

Monday, 11 September 2017

ज्ञानसंजीवनी


आज भाद्रपद वद्य षष्ठी - आज श्री ज्ञानेश्वरी जयंती आहे त्यानिमित्य

श्रेष्ठ ज्ञानदेवी | गीतेचा साज | सगुणमूर्ती | ब्रह्मविद्येची ||१||
देई संदेश | गीता माऊलीचा | शब्द अमृताचे | करुनिया ||२||
नर-नारायण संवाद | जीवन तत्वज्ञान | प्रकटले साचे | ज्ञानमंदिरात ||३||
राजविद्या गुह्यज्ञान | शब्दातीत ब्रह्म | धर्मसंकीर्तन | वर्णीयेले ||४||
उपनिषदांचे सार | गीतारूपी नवनीत | प्राकृत भाषेतून | भरविले ||५||
उपमा अलंकार | दृष्टांताची खाण | शांतरसे | चोजविले ||६||
विचारधन | प्रत्येक ओवीचे | जन्मजन्मांतरी | पुरणार आहे ||७||
सर्वांच्या हृदयात | हा ज्ञानदीप | अखंड | तेववावा ||८||
शांतचित्ती | यावा अमृतानुभव | हेचि कृपा व्हावी | माऊलींची ||९||