Thursday, 22 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - विजयादशमी


दिवस दहावा - विजयादशमी - दसरा
आज अश्विन शुद्ध दशमी हा दिवस विजया दशमी म्हणून उत्साहाने साजरा केला जातो.
आपल्या सर्वांना नवरात्राची कथा माहिती आहे, ती अशी की रामाच्या हातून रावणाचा वध व्हावा, या उद्देशाने नारदमुनींनी रामाला नवरात्रीचे व्रत करायला सांगितले. नंतर हे व्रत पूर्ण केल्यावर रामाने लंकेवर स्वारी करून शेवटी रावणाला ठार मारले, म्हणून दशहरा (दहा तोंडे असलेल्या रावणाला हरवले - १० अवगुणांचे प्रतिक - काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर, स्वार्थ, अहंकार, आसक्ती व हिंसा) म्हणतात.
अजून एक कथा सांगितली जाते ती अशी की देव आणि दानवांमध्ये युद्ध चालू होते, काही केल्या देव, दानवांचा पराभव करू शकत नव्हते. तेंव्हा सर्व देवानी देवीला आवाहन केले व देवीचा विजय व्हावा म्हणून देव अनुष्ठानाला बसले. महिषासुर सारख्या बऱ्याच बलाढ्य  असुराशी प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून देवीने असुरांना(वाईट प्रवृत्ती) मारले.
दोन्ही कथांमध्ये चांगल्या व वाईट प्रवृत्ती यांचा लढा होता. शेवटी चांगल्या प्रवृतीचा नेहमीच विजय होतो असे आश्वासन दिले आहे. नवरात्रीमध्ये पहिले ३ दिवस शक्ती, नंतरचे ३ दिवस लक्ष्मी आणि शेवटचे ३ दिवस सरस्वतीची पूजा केली. त्यांना आवाहन केले. आमच्यातल्या शक्ती, लक्ष्मी आणि सरस्वती त्यांना जागृत  केले व आमच्या मध्ये असलेल्या तामसी आणि राजसी गुणांना कमी कर व सात्विक गुण वाढव अशी आराधना केली. साधनेने मन एकाग्र व स्थिर झाले. मनाचा पूर्ण ताबा सद्सद्विवेकबुद्धी ला दिला. एकदा का असे झाले की तो आनंदाचा दिवस आला. विजयाचा दिवस आला.
|| हरी ओम तत्सत || श्री कृष्णार्पणमस्तु ||

आपण सर्वचजण आनंदयात्री होऊया हीच त्या आदिशक्तीकडे प्रार्थना




Wednesday, 21 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस नववा



आपल्या सगळ्यांना पांडव व कौरवांची गोष्ट माहीतच आहे. धृतराष्ट्राच्या अतिमहत्वकांक्षेमुळे व आंधळ्या प्रेमामुळे उन्मत्त झालेले कौरव आणि लहानपणीच वडीलांचे छत्र हरवल्यामुळे पण महत्वकांक्षी कुंतीने प्रेमाने, सहृदयतेने वाढवलेले पांडव यांच्यात झालेले युध्द म्हणजे महाभारत.
अनेक नामुष्कीचे प्रसंग येवूनसुद्धा, युध्द थांबवण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरल्यानंतर पांडवांनी कौरवांबरोबर युध्द पुकारले. भगवान श्रीकृष्ण, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य ह्या सर्वांची मात्र पंचाईत झाली होती की कोणाच्या बाजूनी लढायचे. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य ह्यांनी ज्यांची चाकरी करतो त्यांच्याच म्हणजे कौरवांच्या बाजूनी युद्ध करायचे ठरवले. भगवान श्रीकृष्ण यांनी मात्र अर्जुन आणि दुर्योधनाला पर्याय सांगून ठरवायला सांगितले. माझी औक्षयणी सेना एकीकडे आणि मी एकटा एकीकडे राहीन असा पर्याय दिला. अर्जुन आणि दुर्योधन यांनी आपापल्या स्वभावाप्रमाणे निर्णय घेतला. अर्जुनाने सांगितले की देवा तू माझे सारथ्य कर आणि दुर्योधन प्रचंड सेना घेऊन खूप खुश झाला. पुढे युद्धाच्यावेळी मात्र अर्जुनाच्या मनात नाही-नाही त्या प्रश्नांनी घर केले. मोहग्रस्त झालेला अर्जुन लढायला तयार होईना. भगवान श्रीकृष्ण यांच्या लक्षात आले की प्रचंड भावनावश झाल्यामुळे अर्जुन असा वागतोय. अर्जुनाच्या प्रश्नाचे(problem) कारण(root cause) त्यांना कळले. मग गीतेला प्रारंभ झाला. गीतेतील उपदेशामुळे ( निश्चयात्मिका बुद्धी ) अर्जुनाचा मोह नष्ट झाला, युद्ध झाले व तो विजयी झाला हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच.

मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या समूहाला अंतःकरण म्हणतात असे आपण काल पाहिले. मनाचा रोल केवढा मोठा आहे हेही पहिले. गेले ८ दिवस अहंकार कमी का व कसा करायचा तेही पहिले. आज मना एवढाच मोठा रोल बुद्धी कशी निभावते हे पाहूया. शास्त्रामध्ये बुद्धीला सारथी म्हटले आहे. खालील उदाहरण कळायला खूप सोपे होईल.
आपल्या शरीराला रथाची उपमा दिली आहे. ह्या रथाचे घोडे म्हणजे आपली इंद्रिये. नाक, कान, डोळे, त्वचा आणि जीभ हि पंचज्ञानेंद्रिये आहेत ज्यायोगे आपल्याला बाहेरच्या जगाची माहिती मिळत असते. इंद्रियांचा direct संबध बाहेरच्या जगाशी येत असल्यामुळे हे घोडे सारखे बाहेरच्या विश्वात उधळलेले असतात. पण ह्यांचा लगाम म्हणजे मन. इंद्रियांना काबूत ठेवायचे काम मनाचे असते. बहिर्मुख इंद्रियांना अंतर्मुख करायचे काम मनाचे असते. पण नुसते लगाम चांगले असून चालत नाही तर लगाम खेचणारा सारथी उत्तम असायला लागतो. शास्त्रामध्ये बुद्धीला सारथी म्हटले आहे. कधी आणि किती लगाम खेचायचे हे काम जर बुद्धीने बरोबर केले नाही तर रथ सुसाट सुटेल आणि नको तिकडे जाईल. त्यामुळे रथस्वामी कितीही पराक्रमी असला तरी काही उपयोग नाही. युद्धातील विजय हा सारथ्यावर अवलंबून असतो. अर्जुन कितीही पराक्रमी असला तरी तो श्रीकृष्ण सारथी नसते तर जिंकू शकला नसता.
आपल्या आयुष्यात बुद्धीचा रोल प्रचंड महत्वाचा आहे. इंद्रिय आणि मन(संकल्प-विकल्प) यांचा स्वभावच आहे confuse करायचा पण जर बुद्धीने बरोबर निर्णय घेतला तर ती मनाला ताब्यात ठेवू शकते.
बुद्धी फक्त निर्णय घेत नाही तर तिचे बाकीचे पैलू म्हणजे चांगल्या आणि वाईट याची समज( perception), तारतम्य(discrimination), सद्सद्विवेक, तर्कसंगती(rationality), सर्व विषयाचे आकलन(comprehension), एकदा ठरले की त्याप्रमाणे अंमलबजावणी (mindfulness), प्रसंगावधान(presence of mind), आधीच्या प्रसंगातून घेतलेला बोध(understanding) आणि त्यातून आलेले शहाणपण(wisdom) असा आहे.

आपण सगळेच बरेचदा अर्जुन(मोहग्रस्त) होतो. आपल्या आयुष्यात कित्येक महत्वाचे आणि अवघड प्रसंग येतात तेंव्हा आपल्या मनाची confused, unstable अशी अवस्था असते. कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे तर अजूनच वाईट होते. तेंव्हा जर सद्सदविवेकबुद्धीने (observe-analyze-discriminate-decide-act) वागलो तर चांगला मार्ग नक्की निघेल.
समाजाचे अधःपतन हे स्वैर आणि एककल्ली विचारामुळेच होत आहे. सद्सदविवेकबुद्धी न वापरल्यामुळे होत आहे. खरतर माणसाला माणूसपण हे बुद्धी मुळेच आले आहे नाहीतर माणूस आणि पशू ह्यात फरक तो काय राहिला?

अर्जुनाने जसे आपले सारथ्य भगवान श्रीकृष्णकडे दिले आणि विजयी झाला तसेच आपणही आपले सारथ्य सद्सदविवेकबुद्धी कडे देवूया.

दिवस नववा: 


सातवी आदिशक्ती: 'सिद्धीदात्री'- सर्व प्रकारच्या सिद्धी देणारी देवी (अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी मार्कण्डेय पुराणात सांगितल्या आहेत.)
रूप: चार भुजाधारी - तिच्या हातात कमळाचे फूल, शंख, गदा आणि चक्र आहे.
देवी: श्री सिद्धीदात्री
देवीचे वाहन: सिंह
आजचा रंग: जांभळा
मंत्र: 
सिद्धगन्धर्वयक्षारसुरैरमरैरपि।
सेव्यमाना सदा भूयात् सिद्धीदा सिद्धीदायिनी।।


 आजचे जांभळे मंडल

Tuesday, 20 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस आठवा

कालच आपण पाहिले 'स्व' चा शोध घेणे हेच मानवी जीवनाचे आद्यकर्तव्य आहे. आध्यात्मिक उन्नती काय किंवा  भौतिक उन्नती काय,  अगदी सगळ्याच क्षेत्रात , स्पोर्ट्समध्ये सुद्धा मनोनिग्रह (mind control ) हा महत्वाचा आहे. Stronger body and calmer mind ह्याला सगळीकडेच महत्व आहे पण आपले अगदी उलटे असते. मनामध्ये सतत विचार चालू असतात. मनाचे माकड अगदी धुमाकूळ घालत असते. Past, Present and Future असे सारखे विचार चालू असतात. मग प्रश्न पडेल की  मन म्हणजे नक्की काय? मन शांत होणे शक्य आहे का? ते  शांत कसे करायचे? 


पूर्वी आपल्या सगळ्यांच्या घरी कंदील असायचे. (नवीन पिढीला माहित नसतील म्हणून मुद्दाम फोटो टाकलाय.) तो कंदील वर्षानुवर्षे वापरला जायचा. त्यामुळे नियमित साफसफाई लागायची. विचार करा की जर कंदील आपण नुसता वापरला पण त्याची साफसफाई केली नाही तर नक्कीच धुळीचे थर चढत जातील. मग आपण एक दिवस ज्योत पेटवली तरी प्रकाश बाहेर येणार नाही. मग आपण असे म्हणू शकू का की ज्याअर्थी प्रकाश बाहेर येत नाही त्याअर्थी आत ज्योत नाही?  
मग काय केले पाहिजे?
तर त्या काचेवरची धूळ साफ केली पाहिजे . जेंव्हा ती साफ होईल तेंव्हा ज्योत आतच असल्यामुळे लखकन प्रकाश येईल.
आता हेच logic आपल्या स्वतःला लावूया - 
कंदील म्हणजे आपला देह आहे. आतली ज्योत म्हणजे चैतन्य आहे आणि काच म्हणजे आपले अंतःकरण. चैतन्य तर आहेच पण अंतःकरण इतके मलीन (दोष) झाले आहे की त्यामुळे चैतन्याचा प्रकाश दिसत नाही. त्यामुळे सगळी मेहनत काच साफ करायला म्हणजे अंतःकरण शुद्धी करण्याकरता करायची आहे.
अंतःकरण म्हणजे काय?
मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या सगळ्या समूहाला मिळून अंतःकरण म्हणतात. हे सूक्ष्म आहे म्हणजे दाखवता येत नाही पण अनुभवता येते. हा कुठला अवयव नाही पण आपण ज्या  क्रिया करतो त्या प्रत्येकामध्ये ह्याचा सहभाग असतो. आपण एका उदाहरणावरून समजावून घेऊया.
आपण बाहेर फिरायला गेलोय. वाटेत आंब्याचे झाड दिसले. मस्त पिवळाधमक आंबा पहिला आणि खायची मनीषा झाली.
१. आंबा खायचा आहे/ तोडू का?/ कुणी पहिले तर? / पहिले तर काय म्हणतील? पण मला पाहिजेच वगैरे -- मन - संकल्प-विकल्प
२. हे झाड कुणाचे आहे? / असा आंबा तोडणे योग्य आहे का? नाही चोरणे बरोबर नाही -- बुद्धी - निर्णय
३. आंबा कसा बरे पडता येईल? / काठीने की दगडाने? कधी बर पडला होता आधी?---चित्त - चिंतन आणि स्मृती
४. आंबा पाहिजे आणि तो दगडांनी पाडायचा ------ अहंकार - इंद्रियांना सूचना

सर्वसाधारणपणे हे चक्र प्रत्येक गोष्टीसाठी अव्याहत चालू असते. बाहेर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम अंतःकरणावर होत असतो. ( जन्मानुजन्मे) ह्यावरून आपल्याला अंदाज येईल की मनाचा रोल किती महत्वाचा आहे. Mind control किंवा मनोनिग्रह हा प्रत्येक क्षेत्रात का महत्वाचा आहे?  आध्यात्मिक उन्नतीकरता तर प्रचंड महत्वाचा आहे. अंतःकरण शुद्धी म्हणजे मनाचीच शुद्धी करायची आहे. म्हणजे मनाचे जे दोष आहेत ते कमी करण्याकरता मेहनत करायची आहे. मनाचे दोष हे आहेत --  Unstable mind, Reacting mind  आणि Conflicting mind.


१. मनाचा भरकटणे हा जसा स्वभाव तसाच गुंतणे हा देखील. त्यामुळे मनाला जास्तीतजास्त चांगल्या गोष्टीत गुंतवायचे. 
२. " आगते स्वागतम कुर्यात " प्रत्येक प्रसंग जसा असेल तसा accept करायचा
३. भूतकाळ आणि भविष्यकाळात न रमता फक्त वर्तमानाचा विचार करायचा. Encash every moment. प्रत्येक कामात १००% लक्ष्य द्यायचे.

वर सांगितलेल्या कुठल्याच गोष्टी सोप्या नाहीत. पण रोज थोडेतरी तसे वागलो तर नक्कीच एक दिवस मनोनिग्रह शक्य आहे. आपण शरीर सुदृढ होण्यासाठी जितके कष्ट घेतो त्यापेक्षा मन सुदृढ होण्यासाठी घेऊया म्हणजे जीवन सुंदर नक्की होईल.
खरेतर हा विषय इतका मोठा आहे की एका लेखात सांगणे शक्य नाही पण विचाराला चालना मिळावी हा हेतू आहे.
महागौरी आपल्या सगळ्यांना  तशी बुद्धी देवो ही प्रार्थना. 

दिवस आठवा:

आठवी आदिशक्ती: ' महागौरी'
रूप: या देवीचा रंग पूर्णत: गोरा आहे. या गोर्‍यापराची उपमा शंख, चंद्र आणि कुंदाच्या फुलापासून दिली आहे. या देवीचे वय आठ वर्ष मानले जाते, 'अष्टवर्षा भवेद् गौरी।' तीचे वस्त्र आणि आभूषणदेखील श्वेत रंगाची आहेत. तिच्या वरील उजव्या हातात अभयमुद्रा आणि खालील उजव्या हातात त्रिशूळ आहे. वरच्या हातात डमरू आणि वर-मुद्रा आहे.
देवी: श्री महागौरी
देवीचे वाहन: वृषभ
आजचा रंग: गुलाबी
मंत्र : 
श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचि:।
महगौरी शुभं दान्महादेवप्रमोददा।। 

 आजचे गुलाबी मंडल










Monday, 19 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस सातवा

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता 
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना। 

या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता 
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥१॥


आज नवरात्रीचा सातवा दिवस. ७,८,९ दिवस अनुक्रमे सरस्वतीचे पूजन केले जाते. सरस्वती म्हणजे आपल्या डोळ्यापुढे वरील मूर्ती येते. लहानपणापासून आपण तिचे ज्ञानाची देवता म्हणून पूजन केले आहे.
तिचे वर्णन असे आहे -
तिची अत्यंत प्रसन्न व शांत मुद्रा आहे.(सात्विक), तिने पांढरी साडी परिधान केली आहे.(पांढरा रंग हा पावित्र्याचे आणि वैराग्याचे प्रतिक आहे), तिचे वाहन राजहंस आहे.(हंस हा नीरक्षीरविवेक चे प्रतिक आहे - म्हणजे चांगले आणि वाईट यामधला फरक करण्याचा विवेक),  तिच्या हातात पुस्तक आहे(ज्ञानाचे प्रतिक), तिच्या दुसऱ्या हातात जपमाळ आहे(ध्यानाचे प्रतिक) आणि तिच्या उरलेल्या दोन हातात वीणा आहे.(संगीत आणि कलेची देवता)
सर्वसाधारणपणे ज्ञान म्हटले की आपली डोळ्यापुढे Engineering, Medicine, Architecture, Commerce, Arts, व्यवहार अश्या वेगवेगळ्या शाखा आणि त्यांच्या उपशाखा येतात. आपल्याला या भौतिक जगातल्या यशासाठी आणि चरितार्थासाठी ह्या विद्यांची गरज आहेच पण उपनिषदामध्ये विद्येचा उल्लेख परा विद्या आणि अपरा विद्या असा केला आहे.

परा विद्या - अध्यात्म विद्या - आत्मज्ञान (Superior knowledge)
अपरा विद्या - भौतिक जगाबद्दल ज्ञान( Material knowledge)

भगवतगीतेमध्ये ही भगवान श्रीकृष्णानी आपली विभूती अध्याम विद्या असे सांगितले आहे. अध्यात्म विद्या ही स्वतःला ओळखण्याची आणि जाणून घेण्याची विद्या होय. अध्यात्म विद्या आपल्याला ह्या जगताबद्दल, ते कसे अस्तित्वात आले त्याबद्दल, सर्व जीवांच्या उत्पत्तीबद्दल, 'स्व' च्या अस्तित्वाबद्दल आणि हे जग सोडून गेल्यावर काय ह्याही बद्दल ज्ञान देते. अध्यात्म विद्या ही भारताची जगाला देणगी आहे.
आता 'स्व' ला जाणायचे म्हणजे काय? साधारणपणे 'स्व' - मी कोण हा प्रश्न मला विचारला तर माझी ओळख मी माझे नाव, कुणाची मुलगी, कोणाची पत्नी, कोणाची आई, माझा हुद्दा अशी वेगवेगळी देईन पण ही माझी पूर्ण ओळख आहे का?
त्यासाठी एक उदाहरण घेऊया -
आपण जेंव्हा रोज रात्री झोपतो तेंव्हा शरीर दिवसभर दमते आणि रात्री आडवे झाले की झोपते. काही वेळा आपल्याला गाढ झोप लागते तर काही वेळा स्वप्न पडते. स्वप्न पडले तर ह्याचा अर्थ आपले शरीर झोपलेय पण मन जागे आहे. दिवसभर चाललेल्या विचारांचे मंथन मन करत असते. पण अशी एक वेळ येते की जेंव्हा मनही दमते आणि गाढ झोप लागते. सकाळी जेंव्हा आपण उठतो तेंव्हा आपल्याला शरीर आणि मन झोपलेले असून सुद्धा रात्रभर स्वप्न पडले की गाढ झोप लागली ह्याची जाणीव असते. जर शरीर आणि मन दोन्ही झोपले होते तर कोण जागे होते? कोण आयुष्यभर माझ्या सगळ्या व्यवहाराचा साक्षी होते?
खरतर ती ' स्व ' ची जाणीव हीच आपली खरी ओळख आहे, ज्याला चैतन्य असे म्हणतात. ते चैतन्य आहे म्हणून आपले सगळे व्यवहार चालू आहेत. ज्यादिवशी हे चैतन्य शरीर सोडून जाते त्यादिवशी आपण अस्तित्वात नसतो. पण आयुष्यभर अज्ञानामुळे आपण ह्या चैतन्याला विसरतो व हे शरीर आणि त्याशी निगडीत नातेसंबंध हेच खरे धरून चालतो. हे अज्ञान दूर करणे हाच आपल्या सर्वांचा पुरुषार्थ आहे. खऱ्या 'मी' चा('स्व') चा शोध घेणे हीच इतिकर्तव्यता आहे. एकदा स्वत्वाची जाणीव झाली की मग कुठलेच प्रश्न पडत नाहीत. त्या 'स्व' ची अनुभूती येणे हेच आत्मज्ञान आणि हाच मोक्ष आहे.

दिवस सातवा:

सातवी आदिशक्ती: 'कालरात्री'
रूप: या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कट्यार) आहे.
देवी: श्री महाकाली
देवीचे वाहन: गाढव
आजचा रंग : पांढरा
तत्वाशी संबधित आकार: डाळिंबाची कळी
साधना: मन 'सहस्त्रार' चक्रात स्थिर करतात 
मंत्र : 
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थित।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरी‍रिणी।।
वामपादोल्लसल्लोहलताकंटकभूषणा।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भययंकारी।।


नऊ दिवसाचे नऊ गोल
आजचा रंग: पांढरा ||  गोल: सातवा ||  आकार: डाळिंबाची कळी


Sunday, 18 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस सहावा

 देवी तत्व
आपण जेंव्हा आजूबाजूला सृष्टी पाहतो - मनुष्य, प्राणी, पक्षी, वनस्पती, ग्रह, तारे, इत्यादी. तेंव्हा आपल्या मनात नक्कीच विचार येतात की हे सर्व कसे झाले असेल? कशापासून तयार झाले असेल? कोणी बनवली असेल? वगैरे. ह्याला शास्त्रामध्ये ' कार्यकारण सिद्धांत ' असे  म्हणतात- " कारणम विना कार्य न सिद्धती| "
आता एक घटाचे उदाहरण घेऊया
१. घट(कार्य) हा मातीपासून(कारण) बनलेला असतो. मातीशिवाय तो बनूच शकत नाही. पण माती स्वतः त्याला बनवू शकत नाही.
२. त्यासाठी कोणीतरी skilled person(कर्ता) लागतोच.
३. घट तयार (उत्पत्ती) होतो, वापरात(स्थिती) येतो आणि नंतर फुटतो(लय) पावतो. म्हणजे घट हा आधी माती होता आणि फुटल्यावर मातीच होणार. म्हणजे माती(कारण) हेच तिन्ही काळात सत्य आहे.
४. जे मातीचे गुणधर्म आहेत तेच घटात असणार. घटाचे वेगवेगळे आकार व त्याप्रमाणे नावे असतात, जसे रांजण, माठ, घट इत्यादी.
जर घटासारख्या अचेतन गोष्टीलाही कारण आणि कर्ता आहे तर मनुष्य, प्राणी, वनस्पती, निसर्ग, ग्रह, तारे ह्या सर्व सृष्टीला सुद्धा कारण आणि कर्ता असायलाच पाहिजे.
हेच logic जर आपण सृष्टीला लावले तर
१. सर्व सृष्टी -मनुष्य, प्राणी, वनस्पती, निसर्ग, ग्रह, तारे(कार्य) हे पंचमहाभूते आणि त्रिगुण (कारण) यापासून बनलेले आहे.
२. हे सर्व जिचे कार्य आहे ती प्रकृती - देवी (कर्ता) असली पाहिजे.
३. सृष्टीतील सर्वाना उत्पत्ती, स्थिती, लय आहे.
४. जे प्रकृतीमध्ये आहे तेच सर्व सृष्टीमध्ये आहे.

ह्यावरून असेच म्हणता येईल की असे एक तत्व आदिकालापासून आहे जे ह्या साऱ्या सृष्टीचा उत्पत्ती (Generator), स्थिती(Operator), लय(Destroyer) आहे. ज्याला आपण देवी तत्व म्हणतो. हे सगळे आपल्या सारख्या सगळ्यांच्या बुद्धीला पटावे म्हणून आपण आपल्याला आवडेल अशी तिची प्रतिमा तयार केली, वेगवेगळी नावे दिली व तिला आपल्या स्वभावाप्रमाणे वेगवेगळ्या रुपात पुजायला लागलो. जसे शक्ती, लक्ष्मी, सरस्वती, अंबामाता, पार्वती, कालीमाता,पद्मावती वगैरे. हे देवीतत्व आपल्या सर्वांमध्ये आहे. नवरात्रीमध्ये आपण ह्याच देवीतत्वाला आवाहन करतो आणि स्वतःला तिच्या अस्तित्वाची आठवण करून देतो.



दिवस सहावा:

सहावी आदिशक्ती: 'कात्यायनी' (प्रसिद्ध महर्षी कात्यायनानी भगवतीची कठोर तपस्या केली.भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.)
रूप: चारभुजाधारी- देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे.
देवी: श्री लक्ष्मी
देवीचे वाहन: सिंह
रंग : केशरी
तत्वाशी संबधित आकार: फुलाची पाकळी
साधना: मन 'आज्ञा' चक्रात स्थिर करतात 
मंत्र : ओंकार जपसाधना

नऊ दिवसाचे नऊ गोल
आजचा रंग: केशरी ||  गोल: सहावा ||  आकार: फुलाची पाकळी



Saturday, 17 October 2015

नवरात्री - नऊ दिवसांचे महात्म्य - दिवस पाचवा



प्रकृती ही आठ गोष्टीनी बनलेली असते म्हणून तिला अष्टधा प्रकृती म्हणतात - पंचमहाभूते+त्रिगुण. प्रकृतीमध्ये जन्मलेला प्रत्येकजण( मनुष्य, प्राणी, वनस्पती) हा तीन गुणांनी बनलेला असतो - सत्व, रज आणि तम. भगवंताची करणी अगाध आहे की जरी सर्वजण अष्टधा प्रकृतीचे असले तरी प्रत्येकजण वेगळा आहे. प्रत्येकजण जन्माला येताना ह्या ३ गुणांचे combination घेऊन येतो व त्या गुणांच्या प्रभावाप्रमाणे वागतो. आपण आजूबाजूला पाहिले असता आपल्या लक्षात येईल की माणसांच्या आवडीनिवडी, स्वभाव, विचार आणि वागणे हे त्रिगुणांच्या combination वर अवलंबून असतात.
सर्वसाधारणपणे ह्या त्रिगुणांचा प्रभाव असा दिसून येतो-
१. सात्विक:  दयाळू, कनवाळू, दुसऱ्याचा विचार करणारे, संवेदनशील, शांत, निर्गर्वी, काहीही अपेक्षा न ठेवता मदत करणारे, समाधानी, आनंदी, निर्भयी, क्षमाशील आणि उत्साही
२. राजस: सतत काहीतरी करावे वाटणारे, चंचल, शूर, पराक्रमी, गर्विष्ठ, मत्सरी, अपेक्षा ठेऊन मदत करणारे, लीडर, असंतुष्ट, सगळ्या गोष्टीत आसक्ती आणि प्रत्येक गोष्टीची कामना करणारे
३. तामस: आळशी, स्वार्थी, कावेबाज, कुणालाही मदत न करणारे, फक्त स्वतःचा विचार करणारे, निरुत्साही आणि सतत दुःखी
(हे वर्णन ठोकळमनाने दिले आहे - सगळे वर्णन करणे इथे शक्य नाही)
१००% सात्विक कुणीच नसते. सगळेजण ह्यापैकी २ व ३ गुणांचे combination घेऊन जन्मतात. प्राणी आणि वनस्पती यांना जन्मल्यावर ह्या combination मध्ये बदल करता येत नाही पण भगवंताने हे स्वातंत्र फक्त माणसाला दिले आहे. जन्माला येताना कसाही आला तरी बुद्धी असल्यामुळे आपल्या स्वभावात, वागण्यात त्याला बदल करता येतो. (आपल्या गुणांचा त्याग करता येत नाही) जेणेकरून रज आणि तमोगुण कमी करून perfection च्या दिशेने म्हणजे त्याला सात्विक होता येते. एकावेळी एका गुणाचा प्रभाव आपल्यावर असतो. आपण स्वतःचे निरीक्षण केले तर लक्षात येईल की आपण काही प्रसंगी चांगले वागतो तर काही प्रसंगी नाही ह्याचे कारण जेंव्हा आपण चांगले वागतो तेंव्हा आपल्यावर सात्विक गुणाचा प्रभाव असतो. आपण साधना ह्याच गोष्टींकरता करायची की जेणेकरून सात्विक गुण नेहमीच बाकी दोन्ही गुणांना suppress करेल. खरेतर जीवन जगायला ह्या तिनही गुणांची गरज आहे.
सात्विक होण्यासाठी आपल्यात असणाऱ्या सात अवगुणांना weak करावे लागेल - कामना, क्रोध, मद, मोह, मत्सर, आसक्ती आणी अहंकार
नवरात्रीमध्ये साधना पहिले ३ दिवस शक्ती(तमास गुणांवर विजय), नंतरचे ३ दिवस लक्ष्मी(राजस गुणांवर विजय आणि शेवटचे ३ दिवस सरस्वती( सत्वगुण वृद्धी) साठी करायची आहे.

काल सांगितल्याप्रमाणे, जर पूर्ण आनंद, समाधान आणि शांती हवी असेल म्हणजे नारायणाची प्राप्ती करायची असेल तर आधी सात्विक होण्याकडे आणि नंतर निर्गुण होण्याकडे वाटचाल करावी लागेल.

दिवस पाचवा:

पाचवी आदिशक्ती: 'स्कंदमाता
रूप: चारभुजाधारी - दोन हातामध्ये कमळ, एक हात आशीर्वादासाठी आणि एका हाताने स्कंदाला म्हणजे कार्तिकेयाला धरले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे.
देवी: श्री लक्ष्मी
देवीचे वाहन: सिंह
रंग : करडा- ग्रे
तत्वाशी संबधित आकार: चक्र
साधना: मन 'विशुद्ध' चक्रात स्थिर करतात 
मंत्र : 
सिंहासनगता नित्य पदमाश्रितकरद्वया|
शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी||

नऊ दिवसाचे नऊ गोल
आजचा रंग: करडा - ग्रे ||  गोल: पाचवा ||  आकार: चक्र