या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युत शंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा॥१॥
आज नवरात्रीचा सातवा दिवस. ७,८,९ दिवस अनुक्रमे सरस्वतीचे
पूजन केले जाते. सरस्वती म्हणजे आपल्या डोळ्यापुढे वरील मूर्ती येते. लहानपणापासून
आपण तिचे ज्ञानाची देवता म्हणून पूजन केले आहे.
तिचे वर्णन असे आहे -
तिची अत्यंत प्रसन्न व शांत मुद्रा आहे.(सात्विक), तिने पांढरी साडी परिधान केली आहे.(पांढरा रंग हा पावित्र्याचे आणि वैराग्याचे प्रतिक आहे), तिचे वाहन राजहंस आहे.(हंस हा नीरक्षीरविवेक चे प्रतिक आहे - म्हणजे
चांगले आणि वाईट यामधला फरक करण्याचा विवेक), तिच्या हातात पुस्तक आहे(ज्ञानाचे
प्रतिक), तिच्या दुसऱ्या हातात जपमाळ आहे(ध्यानाचे प्रतिक) आणि तिच्या उरलेल्या
दोन हातात वीणा आहे.(संगीत आणि कलेची देवता)
सर्वसाधारणपणे ज्ञान म्हटले की आपली डोळ्यापुढे Engineering,
Medicine, Architecture, Commerce, Arts, व्यवहार अश्या वेगवेगळ्या
शाखा आणि त्यांच्या उपशाखा येतात. आपल्याला या भौतिक जगातल्या यशासाठी आणि
चरितार्थासाठी ह्या विद्यांची गरज आहेच पण उपनिषदामध्ये विद्येचा उल्लेख परा
विद्या आणि अपरा विद्या असा केला आहे.
परा विद्या - अध्यात्म विद्या - आत्मज्ञान (Superior
knowledge)
अपरा विद्या - भौतिक जगाबद्दल ज्ञान( Material
knowledge)
भगवतगीतेमध्ये ही भगवान श्रीकृष्णानी आपली विभूती अध्याम
विद्या असे सांगितले आहे. अध्यात्म विद्या ही स्वतःला ओळखण्याची आणि जाणून घेण्याची
विद्या होय. अध्यात्म विद्या आपल्याला ह्या जगताबद्दल, ते कसे अस्तित्वात आले
त्याबद्दल, सर्व जीवांच्या उत्पत्तीबद्दल, 'स्व' च्या अस्तित्वाबद्दल आणि हे जग
सोडून गेल्यावर काय ह्याही बद्दल ज्ञान देते. अध्यात्म विद्या ही भारताची जगाला
देणगी आहे.
आता 'स्व' ला जाणायचे म्हणजे काय? साधारणपणे 'स्व' - मी कोण
हा प्रश्न मला विचारला तर माझी ओळख मी माझे नाव, कुणाची मुलगी, कोणाची पत्नी,
कोणाची आई, माझा हुद्दा अशी वेगवेगळी देईन पण ही माझी पूर्ण ओळख आहे का?
त्यासाठी एक उदाहरण घेऊया -
आपण जेंव्हा रोज रात्री झोपतो तेंव्हा शरीर दिवसभर दमते आणि
रात्री आडवे झाले की झोपते. काही वेळा आपल्याला गाढ झोप लागते तर काही वेळा स्वप्न
पडते. स्वप्न पडले तर ह्याचा अर्थ आपले शरीर झोपलेय पण मन जागे आहे. दिवसभर
चाललेल्या विचारांचे मंथन मन करत असते. पण अशी एक वेळ येते की जेंव्हा मनही दमते आणि
गाढ झोप लागते. सकाळी जेंव्हा आपण उठतो तेंव्हा आपल्याला शरीर आणि मन झोपलेले असून
सुद्धा रात्रभर स्वप्न पडले की गाढ झोप लागली ह्याची जाणीव असते. जर शरीर आणि मन
दोन्ही झोपले होते तर कोण जागे होते? कोण आयुष्यभर माझ्या सगळ्या व्यवहाराचा
साक्षी होते?
खरतर ती ' स्व ' ची जाणीव हीच आपली खरी ओळख आहे, ज्याला
चैतन्य असे म्हणतात. ते चैतन्य आहे म्हणून आपले सगळे व्यवहार चालू आहेत. ज्यादिवशी
हे चैतन्य शरीर सोडून जाते त्यादिवशी आपण अस्तित्वात नसतो. पण आयुष्यभर
अज्ञानामुळे आपण ह्या चैतन्याला विसरतो व हे शरीर आणि त्याशी निगडीत नातेसंबंध हेच
खरे धरून चालतो. हे अज्ञान दूर करणे हाच आपल्या सर्वांचा पुरुषार्थ आहे. खऱ्या
'मी' चा('स्व') चा शोध घेणे हीच इतिकर्तव्यता आहे. एकदा स्वत्वाची जाणीव झाली की
मग कुठलेच प्रश्न पडत नाहीत. त्या 'स्व' ची अनुभूती येणे हेच आत्मज्ञान आणि हाच
मोक्ष आहे.
दिवस सातवा:
सातवी आदिशक्ती: 'कालरात्री'
रूप: या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले
आहेत. गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे. तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे
ब्रह्मांडासारखे गोल आहेत. वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर
प्रदान करते. उजवीकडील खालच्या हातात अभयमुद्रा आहे. तर डावीकडील वरच्या हातात
लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कट्यार) आहे.
देवी: श्री महाकाली
देवीचे वाहन: गाढव
आजचा रंग : पांढरा
तत्वाशी संबधित आकार: डाळिंबाची कळी
साधना: मन 'सहस्त्रार' चक्रात स्थिर करतात
मंत्र :
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थित।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी।।
वामपादोल्लसल्लोहलताकंटकभूषणा।
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भययंकारी।।
नऊ दिवसाचे
नऊ गोल
आजचा रंग: पांढरा
|| गोल: सातवा || आकार: डाळिंबाची कळी
No comments:
Post a Comment